पुणे पोलिस दलातील निलंबित पोलिसाचा प्रताप, लाटले ७३ तोळे सोने आणि १७ लाख रुपये
Tv9 Marathi July 09, 2025 12:45 AM

एका निलंबित पोलिसाच्या प्रतापामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. आपण पोलीस असल्याने बँक मला कर्ज देत नाही असे सांगून एका सराफाकडून या निलंबित पोलीसाने गोड बोलून कर्जाच्या नावाखाली ७३.५ तोळे सोने आणि १७ लाख रुपये घेतले. निलंबित पोलिसाने २६ ऑक्टोबर २०१९ मध्ये २४.६ तोळे सोने घेतले आणि २ जानेवारी २०२० मध्ये ४८.९ तोळे सोने घेतले होते. मात्र, वारंवार तगादा लावूनही हा पैसा परत केला नाही. त्यानंतर चतुशृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आणि आरोपी निलंबित पोलीस गणेश अशोक जगताप हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीचा फायदा घेत जगताप यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला वेगवेगळे कारणे देत त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली. “मी पोलीस खात्यात नोकरीला असल्यामुळे माझ्या नावाने बँकेतून कर्ज काढता येत नाही. माझ्याकडे ५ किलो सोने आहे. परंतू ते दुकानात मी गहाण ठेवलेले आहे. माझे मार्केटमध्ये १ कोटी रूपये आहेत. माझ्या नावावरील जमीन विक्रीचा व्यवहार लवकरच होणार आहे. त्यातुन येणाऱ्या रक्कमेतून तुमच्याकडून घेतलेली रक्कम आणि सोने परत करेन” अशी बतावणी जगताप यांनी केली होती.

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जगताप यांना रोख रक्कम धनादेश आणि सोन्याच्या दागिन्यांच्या स्वरूपात मदत केली. फिर्यादी यांनी त्यांच्या जवळील एकूण ७३.५ तोळे सोने दोन टप्प्यात दिले. यापैकी जगताप यांनी २६ ऑक्टोबर २०१९ मध्ये २४.६ तोळे सोने घेतले आणि २ जानेवारी २०२० मध्ये ४८.९ तोळे सोने घेतले होते. यासोबतच फिर्यादी यांच्या मुलाकडून आणि पतीकडून वेळोवेळी रोख रक्कम सुद्धा घेतली होती. आपण प्रॉपर्टी विकून तुमचे पैसे आणि सोन्याचे दागिने परत करेन असे जगताप यांनी सांगितले. मात्र फिर्यादीचे पैसे आणि दागिने परत मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

२०२४ मध्ये देखील केली होती सराफाची फसवणूक

२१ ऑगस्ट २०२४ मध्ये जगताप यांची पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. मात्र, तेथे हजर न राहता त्यांनी यादरम्यान आणखी एका सराफाला गंडा घातला. पुण्यातील औंध भागात असलेल्या एका सराफाकडून जगताप यांनी पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले होते. सराफाने पैसे मागितल्याचा राग आल्याने जगताप यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप याचे निलंबन केले होते.

राष्ट्रपती पदकासाठी दिले खोटे कागदपत्र

राष्ट्रपती पदक या पुरस्कारासाठी देखील जगताप यांनी २०२१ मध्ये सरकारची फसवणूक केली होती. राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला. या प्रकरणी पुणे पोलिसदलातील गणेश जगताप सह 2 लिपिकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी पदक मिळावं यातही जगताप यांनी सेवा पुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण करून त्याच्या आधारे खोटा दस्त तयार केला होता. या दस्तावर सुद्धा खोट्या सह्या करून त्यावर शिक्के मारत वेतनवाढीच्या झालेल्या कारवाईचे रेकॉर्ड नष्ट करून टाकले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.