भारतीय संस्कृतीत विशेषतः हिंदू धर्मात, प्रत्येक परंपरेमागे काहीतरी सखोल अर्थ दडलेला असतो. अशीच एक जुनी आणि आजही पाळली जाणारी प्रथा म्हणजे, पहिली चपाती गाईला आणि शेवटची चपाती कुत्र्याला देणे.
ही केवळ एक साधी प्रथा नसून, तिला धार्मिक, ज्योतिषीय आणि काही अंशी वैज्ञानिक दृष्टिकोनही जोडलेला आहे. ही प्रथा परंपरा शतकानुशतके चालत आलेल्या या परंपरेमागे नेमके काय कारण आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.
हिंदू धर्मात गाईला ‘गो माता’ म्हणून पूजले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, गाईमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा वास असतो. त्यामुळे घरात बनवलेली पहिली पोळी गाईला खायला दिल्याने सर्व देवी-देवतांना नैवेद्य अर्पण करण्यासारखे मानले जाते.
यामुळे घरावर सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद कायम राहतो. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा राहते, सुख-समृद्धी नांदते. त्यासोबतच जीवनातील अडथळे आणि कष्ट दूर होतात, अशी दृढ श्रद्धा आहे. ही प्रथा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग असल्याचे मानले जाते.
या परंपरेतील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे घरात बनवलेली शेवटची पोळी कुत्र्याला देणे. कुत्र्याला भगवान कालभैरवाचे वाहन मानले जाते. त्यामुळे त्याला पोळी खाऊ घालणे हे कालभैरवाप्रती आदर आणि श्रद्धा व्यक्त करण्यासारखे आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, कुत्र्याचा संबंध शनि आणि केतू या ग्रहांशी आहे. कुत्र्याला नियमितपणे पोळी खाऊ घालण्याने राहु-केतू आणि शनीचे अशुभ प्रभाव किंवा दोष शांत होतात, असे मानले जाते. हे ग्रह दोष शांत झाल्याने जीवनातील अडचणी कमी होतात. तसेच नकारात्मकता दूर होते.
काही ज्योतिषी मान्यतांनुसार, कुत्र्याला पोळी देण्याने पितृदोष देखील दूर होतो. घरात धन-धान्याची वृद्धी होते. ही प्रथा केवळ ग्रह-नक्षत्रांचे वाईट परिणाम कमी करत नाही, तर अज्ञात संकटांपासून घराचे रक्षण करते असेही म्हटले जाते.
पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला खाऊ घालणे हे केवळ एक धार्मिक कार्य नाही. हे ग्रहदोषांपासून मुक्ती, घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि सुख-समृद्धी प्राप्त करण्याचा एक प्रभावी उपाय मानला जातो. या परंपरेमुळे घरात नेहमी धन-धान्याची कमतरता भासत नाही, अशी पारंपारिक धारणा आहे.
गाईला अन्न देणे हे देवत्व, कृतज्ञता आणि समृद्धीचे प्रतीक आहे, तर कुत्र्याला अन्न देणे हे ग्रहदोष आणि प्राणीमात्रांवरील प्रेम दर्शवते. ही प्रथा आपल्याला निसर्गाशी आणि सर्व जीवसृष्टीशी जोडण्यास मदत करते. ज्यामुळे मानवी जीवनात संतुलन आणि शांती येते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)