दुधाची लोटी तोंडाला लावत दुबेजी म्हणाले, ‘तुम कौन होते हो?’ आम्ही दुधाच्या लोटक्याकडे बघत राहिलो. ते पुन्हा म्हणाले, ‘तुम होते कौन हो?’ आम्ही लोटके बघत उत्तराची जुळवाजुळव करु लागलो. तेव्हा हनुवटीवर न ओघळलेले दूध खांद्यावरल्या गमछाने पुसत दुबेजी म्हणाले, ‘कौन होते हो तुम?’
या तिन्ही प्रश्नांचे उत्तर एकच असावे, असे आम्हाला वाटू लागले. परंतु, काय उत्तर द्यावे हे सुचेना. परिणामी, आम्ही काही बोललो नाही. आम्ही काही बोलत नाही, हे बघून दुबेजींना इसाळ आला. नेहमी हे असेच होते. कुणीतरी काहीतरी लागट बोलते, आणि आम्ही उगीचच गप्प बसून कुढतो.
आमचा संयम बघून दुबेजी सोकावलेल्या काळाच्या चेवात पुढे बोलते झाले, ‘अरे, अपने गली में कुत्ता भी शेर होता है, हिंमत है तो यहां आकर दिखाओ, पटक पटक कर मारेंगे!’ पटक पटक के मारेंगे? म्हंजे काय? उचलून हापटणे असा एक वाक्प्रचार मराठीत आहे. ही कृती सर्वसाधारणपणे अशी : समोरच्याच्या लंगुटास हात घालुनु त्यास अधोबाजूने कुलुपबंद करावे, आणि त्याच समयी गर्दन खालतें चेपुनु गुडघ्याने त्याचे माजोरे धड उचलुनु त्यास रिठ्याच्या पाण्यात बुडवुनु धोतर चुबकावे, तसे चुबक चुबक चुबकावे. या कृतीमुळे समोरच्याचे पटाशीचे दोन्ही दात आणि खालील बाजूचे सुळे निखळून येतात, आणि बरेचशी हाडे स्नायूंपासून थोडकी सुटी होतात.
वरील कृती ही ‘पटक पटक के मारेंगे’ पेक्षा अधिक प्रभावी ठरते, हे कोल्हापूर साईडचा तालमीकडे जाणारा कुठलाही मराठी माणूस सहज सांगेल. मुंबई- पुण्याकडे हेच कार्य फिक्कन हसूनही साधता येते. असो. मनातील विचार मनाशीच ठेवून आम्ही उगेमुगे राहिलो. एवढे ऐकूनही आमचे लक्ष त्यांनी खाली आपटलेल्या दुधाच्या लोटीकडेच होते. डोळे गरागरा फिरवत दुबेजींनी पुन्हा भुंकायला सुरवात केली, ‘आप किसका खाते हो?’
या इसमाने आपले अन्न काढले की हा आपल्या ख्यालीखुशालीची चवकशी करत आहे, हे कळण्यात आमचा थोडा वेळ गेला. वास्तविक सकाळी स्वत:च्याच घरीच पोहे दडपून निघालो होतो. म्हणून आम्ही सहज उत्तर दिले, ‘आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतोऽऽ…अर्थात, हम अपने घरकाच खाते है!’ ‘तुम्हारे पास क्या है? तुम कौनसा टॅक्स भरते हो?,’ दुबेजी आता अर्थशास्त्रात घुसले.
उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, ही मराठी भाषेतली म्हण आम्हाला आठवली. या घटकेला दुबेजींच्या खिशात हात घातला तर वट्ट साडेतीन रुपयांच्या चिल्लरीपलिकडे काहीही मिळणार नाही, याची आम्हाला खात्री होती. पण दुबेजींच्या बाता मोठ्या.
‘टाटांनी पहिली फॅक्टरी बिहारमध्ये टाकली होती, हे विसरु नका! टाटा, बिर्ला कारखाने इकडे उभारतात, आणि टॅक्स मुंबईत भरतात, इतकंच!,’ दुबेजींच्या अर्थशास्त्रीय मांडणीने आम्ही चकितच झालो.
लेका, दुब्या, बालिष्टर का नाही रे झालास?,’आम्ही मनात म्हणालो. उगाच नाही दुबेजींना दिल्लीत (बोगस) ‘डिग्री दुबेजी’ म्हणतात!
‘दरअसल आप हमारेही टुकडों पे पल रहे हो! समझे?,’ दुबेजींनी दुधाच्या रिकाम्या लोटीकडे नजर टाकत दर्पोक्ती केली. इथे मात्र आम्हाला हसू फुटले. त्यामुळे तांबडेनिळेहिरवेजांभळे रंग बदलत ते पुन्हा ओरडले, ‘पटक पटक के मारेंगे!’
एवढा कडक गांजा झारखंडात कुठे मिळत असेल? आमच्या शेजारुन जाणाऱा एका मराठी माणूस तंबाकूचा बार मुखात सोडत एवढेच म्हणाला, ‘अरे जाऊ देना, गेलं उडत!!’