Assembly Election : नितीश कुमारांची महिलांसाठी सर्वात मोठी घोषणा; शिंदे-फडणवीस-पवारांच्या एक पाऊल पुढे…
Sarkarnama July 08, 2025 09:45 PM

Bihar Politics : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून सातत्याने विविध घोषणा केल्या जात आहे. विविध घटकांमधील मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी नवनवीन योजना आणल्या जात आहेत. प्रामुख्याने महिला आणि तरूण वर्गावर सरकारचे विशेष लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी नितीश कुमारांनी महिलांसाठी नोकरीबाबत सर्वात मोठी घोषणा केली.

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. मतदानामध्ये त्याचा परिणाम दिसून आला अन् त्यांचे सरकार पुन्हा आले. लाडक्या बहिणींमुळेच सत्ता मिळाल्याचे तिघांकडूनही मान्य करण्यात आले.

आता नितीश कुमारांनी एक पाऊल पुढे टाकत महिलांसाठी नोकरीमध्ये 35 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या कोणत्याही नोकरीसाठी महिलांना सरसकट 35 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रवर्ग, सर्व स्तर आणि सर्व प्रकारच्या पदांना हे आरक्षण सरसकट लागू असेल. संबंधित महिला या बिहारच्या रहिवासी असाव्यात, ही प्रमुख अट त्यासाठी असणार आहे.

Nishikant Dubey Controversy : दुबेंचा डाव आधी समजून घ्या, ही गरळ उगाच नाही; महाराष्ट्राला डिवचण्याची ही आहेत 3 कारणे...

सार्वजनिक सेवांमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे आणि महिला सबलीकरणासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नितीश कुमारांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करून माहिती दिली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

अधिकाधिक महिलांनी प्रशासनात येत महत्वाची भूमिका पार पाडावी, हा या निर्णयामागचा मुख्य हेतू असल्याचे नितीश कुमारांनी म्हटले आहे. महिलांप्रमाणेच नितीश कुमारांनी युवकांसाठीही मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने बिहार युवक आयोगाची स्थापना करण्यासह हिरवा कंदील दाखवला आहे. बिहारमधील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षणाच्या अधिक संधी मिळाव्यात, यासाठी हा आयोग कार्यरत राहणार असल्याचे नितीश कुमारांनी म्हटले आहे.

Maharashtra on top : खासदार दुबे, बघा महाराष्ट्र किती टॅक्स भरतोय? UP, MP, बिहार एक झाले तरी सोसणार नाही...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारचे हे दोन्ही निर्णय परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून विरोधकांकडून रोजगाराचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात आहे. आता महिलांसाठी आरक्षण आणि युवक आयोगाची घोषणा करत नितीश कुमारांनी विरोधकांच्या हातातील मुद्दा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.