मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे आणि ठाकरे गटाने आज सकाळी मीरा भाईंदरमधील बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत मोर्चाची हाक दिली होती. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईतंर्गत आज पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. तसेच वसई-विरारमधील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे बोललं जात आहे. आता यावरुन मनसेच्या नेत्याने संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच मोर्चाला परवानगी नाकारण्यामागे संताप व्यक्त केला होता. पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. मनसे आणि पोलिसांची कालपर्यंत मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार, त्या मार्गाबाबत चर्चा सुरू होती. मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल असा मार्ग मागत होते. पण, पोलिसांनी त्यांना नेहमीचा मार्ग घेण्यास सांगितले. मात्र, मनसेने त्याला नकार देत आम्ही आमच्याच मार्गाने जाणार अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
म्हणून या उलट्या बोंबा आहेत?आता यावरुन मनसे नेते राजू रतन पाटील यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. “एकंदरीतच मिरा-भाईंदर मधील मराठी मोर्चा साठी परवानगी देण्यावरून सरकारकडून ज्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत व सरकारमध्येच दोन पक्षात जो गोंधळ सुरू आहे तो शिंदे-फडणवीस अंतर्गत वाद तर नाही ? की आंदोलन अधिक उग्र होताना दिसत आहे म्हणून या उलट्या बोंबा आहेत?” असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
एकंदरीतच मिरा-भाईंदर मधील मराठी मोर्चा साठी परवानगी देण्यावरून सरकारकडून ज्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत व सरकारमध्येच दोन पक्षात जो गोंधळ सुरू आहे तो शिंदे-फडणवीस अंतर्गत वाद तर नाही ? की आंदोलन अधिक उग्र होताना दिसत आहे म्हणून या उलट्या बोंबा आहेत ?
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase)
तसेच राजू पाटील यांनी पोलिसांकडून मराठी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याच्या घटनेवरही तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मीरा-भाईंदरमध्ये मराठी मोर्चासाठी उत्स्फूर्तपणे एकवटलेल्या महिला भगिनींना पोलीस ज्या प्रकारे गाड्यांमध्ये कोंबून नेत आहेत, हे दृश्य अत्यंत संतापजनक आहे. आज ज्या प्रकारे मराठी माणसाला अतिरेक्यांप्रमाणे वागणूक हे सरकार देत आहे, ते पाहता हे सरकार मराठी माणसांसाठी नाहीच, परंतु हिंदूंसाठी पण असंवेदनशील झाले आहे. या महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.
मराठी लोकांचा मोर्चा का रोखला जातोय?मिरा-भाईंदर मध्ये मराठी मोर्चा साठी उत्स्फूर्तपणे एकवटलेल्या महिला भगिनींना पोलिस ज्या प्रकारे गाड्यांमध्ये कोंबून नेत आहेत हे दृश्य अत्यंत संतापजनक आहे. आज ज्या प्रकारे मराठी माणसाला अतिरेक्यांप्रमाणे वागणूक हे सरकार देत आहे ते पाहता हे सरकार मराठी माणसांसाठी नाहीच परंतु… pic.twitter.com/mAcRSbqpK8
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase)
दरम्यान पोलिसांच्या या कारवाईनंतर मराठी संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा काढण्यास परवानगी दिली जाते, मग मराठी लोकांचा मोर्चा का रोखला जातोय आणि मराठी लोकांनाच का ताब्यात घेतले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.