अखेर कासारवडवली पुलाचे लोकार्पण
ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : घोडबंदर मार्गावरील कासारवडवली, आनंदनगर भागात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधलेल्या कासारवडवली उड्डाणपुलाचे अखेर लोकार्पण करण्यात आले. पुलाचे काम पूर्ण झालेले असतानाही केवळ उद्घाटनासाठी तो वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. सकाळने या घटनेचा पाठपुरावा करत सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडली. त्यानंतर लोकांनी रस्त्यावर उतरून हा पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरला. त्यानुसार मंगळवारी (ता. ८) अखेर पुलाचे लोकार्पण झाले. पूल सुर झाल्याने कासारवडवली परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
घोडबंदर मार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील कासारवडवली भागातील वाहतूक कोंडी दूर व्हावी, यासाठी येथे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक होणार आहे. पूल बांधणाऱ्या कंपनीने पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले होते, परंतु असे असतानाही तो वाहतुकीसाठी खुला करण्यास विलंब केला जात होता. काही नागरिकांनी तो खुला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना स्थानिक पोलिसांनी नोटीस बजावली होती. याबाबत सकाळने (ता. ३ आणि ७) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मंगळवारी (ता. ८) त्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण झाले.