छत्रपती शिवाजी महाराजांचा युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय गौरव, ग्रीसच्या राजदूतांनी केले राजमुद्रेही कौतूक
Tv9 Marathi July 09, 2025 05:45 AM

ग्रीसच्या राजदूतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचं कौतुक केले आहे.ग्रीसचे युनेस्कोमधील राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचे कौतुक करत जागतिक पातळीवर त्यांच्या विचारांचा गौरव केला आहे. युनेस्कोमधील ग्रीसचे राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांच्या रचनेची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. त्यांनी म्हटलं की, राजमुद्रेत लिहिलेले शब्द ‘अतिशय ज्ञानी आणि दूरदृष्टीपूर्ण’ लिहीलेले आहेत. महाराजांच्या राजमुद्रेत असलेले विचार आणि त्यातील आशय आजही प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राजदूतांनी असेही म्हटले आहे की, ‘शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या राजमुद्रेचा महिमा चंद्राच्या कले सारखा वाढत जाणारा आहे. यापुढेही जग त्याचा सन्मान करेल आणि ती केवळ लोककल्याणासाठी चमकेल.’ राजमुद्रेतील शब्द रचना आणि त्यामागची भावना शिवरायांच्या कार्यपद्धतीचे प्रतीक आहे. ग्रीससारख्या राष्ट्राच्या राजदूताने अशा प्रकारे महाराजांच्या कार्याचा गौरव करणं हे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या कौतूकाने पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना जगभरात किती महत्त्व आहे याचा दाखला मिळत आहे.

येथे पोस्ट पाहा –

The Ambassador of Greece to #UNESCO, His Excellency Mr. Georgios Koumoutsakos calls the words of the Raj Mudra of #Chhatrapati #Shivaji Maharaj as “very wise words”.
The words of the Raj mudra is coming true, “The glory of this mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj) will grow… pic.twitter.com/AMUbKK1Z6v

— Vishal V. Sharma 🇮🇳 (@VishalVSharma7)

छत्रपतींची राजमुद्रा कशी घडली ?

छत्रपती शिवाजी महाराज 1636 मध्ये वडील शहाजी राजांसोबत बंगळुरू येथे वास्तव्यास होते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी, म्हणजे 1642 मध्ये, शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीची जबाबदारी दिली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजमुद्रा, ध्वज, सल्लागार आणि शिक्षणासाठी शिक्षक यांची तजवीज करीत त्यांना पुण्याला रवाना करण्यात आले होते.

या घटनेचा उल्लेख अनेक ऐतिहासिक पुस्तकात तसेच ‘शिवभारत’ या संस्कृत ग्रंथातही करण्यात आला आहे. शहाजी राजे आणि जिजामाता यांनी वापरलेली राजमुद्रा ही फारसी किंवा यवनी भाषेच्या प्रभावाखाली होती, तर शिवाजी महाराजांची राजमुद्रा शुद्ध संस्कृत भाषेत होती. इतिहासकारांच्या मते, 1646 साली लिहिलेल्या एका पत्रावर प्रथमच ही राजमुद्रा उमटलेली आहे. 1646 ते 1680 या काळात शिवाजी महाराजांनी वापरलेली मुद्रेची छाप असलेली सुमारे 250 पत्रे आजही संशोधकांच्या संग्रहात उपलब्ध आहेत.

राजमुद्रेवरील मजकूर:

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता॥

साहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

अन्वय:

प्रतिपत् चंद्र लेख इव वर्धिष्णुः विश्ववंदिता॥

साहसूनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते॥

मराठी अर्थ:

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिवस वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.
प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो आणि अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल आणि ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.