भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. अंतराळात जाणारे ते भारतातील दुसरे अंतराळवीर आहेत. गेल्या १२ दिवसांपासून ते अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग करत आहेत. आता ते पृथ्वीवर कधी परतणार? यासंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. शुभांशू शुक्ला आणि त्यांचे साथीदार १० जुलैनंतर कोणत्याही दिवशी पृथ्वीवर परतू शकतात. त्यांचा परतीचा प्रवास फ्लोरिडा किनाऱ्यावरील हवामान परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.
अॅक्सिओम-४ मोहीम १४ दिवस चालणार आहे. त्यामुळेच नासाने अॅक्सिओम-४ अंतराळ स्थानकापासून वेगळे होण्याची तारीख जाहीर केलेली नाही. फ्लोरिडातील हवामान चांगले राहिले तर ही तारीख नासाकडून जाहीर होऊ शकतो.
अंतराळात शेतीचे प्रयोगआंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील शुंभाशू शुक्ला यांच्या मोहिमेचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यात त्यांनी एका अभ्यासाचा भाग म्हणून अंतराळ शेती करण्याचा प्रयत्न केला आहे. शुभांशू यांनी अंतराळ स्थानकात हरभरा आणि मेथीचे बीज लावले आहे. त्यांनी पेट्री डिशमध्ये अंकुरलेल्या बियांचे आणि स्टोरेज फ्रीजरमध्ये ठेवल्याचे फोटोही काढले आहेत. या बिया सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात कशाप्रकारे उगम पावतात याच्या अभ्यासासाठी त्या स्टोअरेजसाठी फ्रीझरमध्ये ठेवल्या आहेत. अंतराळातील दीर्घकालीन मोहिमांमध्ये मानव जीवन टिकवण्यासाठी हे सूक्ष्मजीव महत्त्वाचे ठरू शकतात.
पृथ्वीवर परतल्यानंतर या अंकुरित केलेल्या या बियांवर प्रयोग करण्यात येणार आहे. संशोधक त्यांची अनुवांशिकता, सूक्ष्मजीव परिसंस्था आणि पौष्टिक प्रोफाइलमध्ये काय बदल होतात त्याचा अभ्यास करणार आहे, असे झिओम स्पेसने एका निवेदनात म्हटले आहे.
भारतात कोण करणार संशोधनशुंभाशू शुक्ला केवळ एक अंतराळवीर म्हणून नाही तर एक वैज्ञानिक आणि शेतकरी म्हणून अंतराळात आपली भूमिका पार पाडत आहे. अंतराळात गेल्यापासून ते विविध प्रयोग करत आहेत. अंतराळात शेती करण्याचा प्रयोगावर कर्नाटकातील कृषी विद्यापीठाचे प्रा. रविकुमार होसामानी आणि आयआयटी धारवाड येथील डॉ. सुधीर सिद्धापूरेड्डी हे संशोधन करणार आहे.