फिल्मी स्टाईल पाठलाग, अंधाराचा फायदा घेत व्यापाराला लुटलं; कल्याणमध्ये रात्री 9.30 वाजता काय घडलं?
Tv9 Marathi July 11, 2025 03:45 PM

गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. त्यात काल कल्याणमध्ये पुन्हा एकदा लुटमारीची गंभीर घटना समोर आली आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वालधुनी पुलावर रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घरी जात असलेल्या एका व्यापाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हेल्मेटधारी चोराने ही चैन हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारातही होणाऱ्या या वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात राहणारे राजू चुनीलाल आसरानी (६४) हे व्यापारी रात्री 9.30 च्या सुमारास आपल्या दुचाकीवर वालधुनी पुलावरून घरी जात होते. त्याचवेळी एका हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने त्यांचा पाठलाग करत होता. त्यांना काही कळायच्या आत, या चोरट्याने आसरानी यांच्या गळ्यातील २ लाख ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची होलो जंजीर कलाकृतीची चेन हिसकावून घेतली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत क्षणात पळ काढला. आसरानी यांनी आरडाओरडा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत चोर तोपर्यंत फरार झाला होता.

या घटनेनंतर राजू आसरानी यांनी तत्काळ कल्याण महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विकास मडके आणि त्यांचे सहकारी या लुटारू दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या महिनाभरापासून कल्याण-डोंबिवलीच्या विविध भागांत दुचाकीवरून येऊन पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष यांना हे लुटारू लक्ष्य करत असल्याने ही एक ठराविक टोळी करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी यावर तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.