आज शेअर बाजार मुंबई: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या आठवड्यातील बाजाराचा शेवटचा दिवस म्हणजेच 11 जुलै 2025 मध्ये सर्वच क्षेत्रांतील स्टॉकमध्ये विक्रीचं सत्र कायम राहिलं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील टॉप 30 कंपन्यांचा निर्देशांक सेन्सेक्स 689 अंकांनी घसरुन 82509.59 अंकांवर आला. तर निफ्टीमध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांक 205 अंकांनी घसरुन 25,149.85 वर पोहोचला.
आज केवळ एफएमसीजीच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. सर्वाधिक वाढ हिंदुस्तान यूनिलिवर लिमिटेड म्हणजेच एचयूएलच्या स्टॉकमध्ये 5 टक्के वाढ झाली. आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यानं बाजारावर त्याचे परिणाम दिसून आले.
टाटा कन्सलटन्सीचा नफा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढला मात्र तो अपेक्षेपेक्षा कमी होता. यामुळं शेअर बाजारात टीसीएसचा स्टॉक 2.75 टक्क्यांनी घसरला. निफ्टीवर आयटी निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं.
शेअर बाजारात घसरण झाली असली तरी काही कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदुस्तान यूनीलिवर, अॅक्सिस बँक, सन फार्माच्या स्टॉकमध्ये वाढ झाली आहे. टिसीएस शिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये घसरण झाली.
शेअर बाजारात आयटी स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाल्यानं जोरदार विक्री झाली. एफएमसीजी सेक्टरमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारातील अनिश्चिततांमुळं लार्ज कॅप आयटी स्टॉक्समध्ये घसरण झाली. आयटी स्टॉक्समधील कमजोरी आणि टीसीएसच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर निफ्टी आयटी निर्देशांकात 1.85 टक्क्यांची घसरण झाली.
याशिवाय निफ्टी मिड कॅप 100 मध्ये 0.86 टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी स्मॉल कॅप 10 मध्ये 1 टक्क्यांची घसरण झाली. इंडिया VIX च्या स्टॉक्समध्ये 1.90 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा