'मुंबईचा डीएनए हिंदूंचा, महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार…', नितेश राणे यांचा दावा
Tv9 Marathi July 11, 2025 05:45 PM

गोल टोप्या घातलेल्या आणि दाढी असलेल्या लोकांनी मला मतदान केले नाही. मला हिंदूंनी मतदान केले आहे. त्यानंतर मी आमदार झालो. यामुळे मी हिंदूंची बाजू घेतली नाही, तर मी उर्दू लोकांची बाजू घेईन का?  हिंदू म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे. मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे. मुंबई महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री व भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे.

तासांचा प्रवास मिनिटांमध्ये होणार

नितेश राणे यांच्या हस्ते ‘बोरीवली रो-रो जेट्टी (फेज १)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन शुक्रवारी झाले. यावेळी भाजप सरकारच्या काळात ज्या घोषणा होतात, ती सर्व कामे पूर्ण होत असल्याचे सांगितले होते. बोरीवली रो-रो प्रकल्पासंदर्भात बोलताना ते म्हणाले, रो रो बोट सेवेत गाड्यांसह प्रवासी प्रवास करू शकतात. यामुळे यापूर्वी ज्या प्रवाशाला एक तास 30 मिनिटे लागत होते ते आता पंधरा मिनिटांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन महायुती सरकार काळात झाले होते. आता त्याचे उद्घाटन देखील महायुती सरकारच्या काळात होत आहे.

संजय राऊत यांना टोला

संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव वाढत असल्याचे म्हटले होते. त्यावर नितेश राणे म्हणाले, मातोश्री किंवा कलानगरची कुठेली जनता तर आमच्याबरोबर आहे. महाराष्ट्राच्या जनतेने 10 महिने अगोदर आम्हाला निवडून दिले आहे. आम्हाला पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिले नाही, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला. भक्तांवर कोण हात उगारत असेल त्यावर कारवाई होईल, मी स्वतः त्यावर माहिती घेईल, असे पंढरपूर येथील सुरक्षारक्षकाने भक्ताला केलेल्या मारहाणीवर राणे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्यावर टीका

मराठीवर एवढेच प्रेम आहे तर उद्याची अजान मराठीत सुरू करा. सगळ्या मदर्सातील उर्दू बंद करून तिथे मराठी सक्ती करा. मग आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात, असे नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना म्हटले आहे.

छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणावर बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, छांगूर बाबाचा निपटारा करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये आमचे योगीजी पुरसे आहेत. त्या बाबाचे महाराष्ट्रात जे चेले असतील, ते आमच्यावर सोडून द्या. त्यांना मिट्टीत मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.