छांगूर बाबा किती श्रीमंत? एकेकाळी मागायचा भीक, आता या कामातून कमावली अब्जावधींची संपत्ती
Tv9 Marathi July 11, 2025 05:45 PM

एकेकाळी रस्त्यावर भीक मागणारा आणि अंगठ्या विकणारा एक सर्वसामान्य व्यक्ती आज अब्जवधींच्या संपत्तीचा मालक झाला आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला छांगूर बाबा आहे. त्याचं खरं नाव जमालुद्दीन असं आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर इथल्या या व्यक्तीने एक बाबा म्हणून आपली ओळख बनवली. परंतु त्याच्या धार्मिक अवतारामागे एक संघटित रॅकेट लपलेलं होतं, ज्यामुळे तो रातोरात इतका श्रीमंत झाला. छांगूर बाबाने धर्मांतरणातून कोट्यवधींची संपत्ती कमावल्याचं म्हटलं जातं. एकेकाळी गरिबीत जगणारा हा छांगूर बाबा आज एका मोठ्या कटाचा केंद्रबिंदू बनला आहे. हा छांगूर बाबा किती श्रीमंत आहे, ते जाणून घेऊयात..

छांगूर बाबाची संपत्ती किती?
छांगूर बाबा सुरुवातीला सायकलवर अंगठ्या आणि बनावट, डुप्लीकेट रत्ने विकून आपला उदरनिर्वाह करायचा. गेल्या दहा वर्षांत त्याची संपत्ती इतकी वाढली की आता तो आलिशान बंगले, शोरुम आणि महागड्या गाड्या अगदी सहज विकत घेऊ शकतो. त्याच्याकडे जवळपास 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे. परदेशातून जमवलेल्या फंडिंगच्या माध्यमातून त्याने ही संपत्ती उभी केली.

सामाजिक-धार्मिक व्यासपीठावर उभं राहून छांगूर बाबा हिंदू मुलींना लक्ष्य करून एक मोठं नेटवर्क चालवत होता. यासाठी त्याने 40 हून अधिक परदेश दौरे केले आणि 100 कोटी रुपयांचा निधी जमवला. उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात अनेक महिलांचं बळजबरीने धर्मांतर केल्याचं उघड झालं आहे. इतकंच नाही तर छांगूर बाबाकडे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या रेट लिस्टदेखील होत्या.

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथ (यूपी एटीएस) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आंनी धर्मांतर टोळीचा प्रमुख सूत्रधार जमालुद्दीन ऊर्फ छांगूर बाबाभोवतीचा फास आणखी घट्ट केला आहे. ईडीने त्याच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या तपासात बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 40 हून अधिक बँक खात्यांमध्ये 106 कोटींहून अधिक रुपये असल्याचं उघड झालं आहे. ज्यापैकी बहुतेक पैसा हा पश्चिम आशियातून आलं असल्याचं सांगितलं जात आहे.

स्वत:ला पीर बाबा म्हणवणारा छांगूर बाबा आता मनी लाँड्रिंग, हवाला व्यवहार आणि परदेशातून मिळवलेला निधी यांसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये अडकला आहे. युपी एटीएसच्या एफआयआरनंतर आता ईडीनेही त्याच्या काळ्या पैशांचा आणि फसवणुकीचा तपास सुरू केला आहे. एटीएसच्या एफआयआरमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्याने तीन ते चार हजार हिंदूंना लक्ष्य करून त्यांना बळजबरीने किंवा आमिष दाखवून इस्लाम धर्म स्वीकारण्यात भाग पाडलं, असं तपासात समोर आलंय. त्यापैकी 1500 हून अधिक महिला होत्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.