पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मंगळवारी मध्यरात्री अनेक सरकारी कार्यालयांना एकामागून एक टार्गेट करण्यात आलं. या सरकारी कार्यालयांवर एकापाठोपाठ एक हल्ले करत स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. ऑपरेशन बाम (डॉन) या नावाने पाकिस्तानात हे स्फोट घडवून आणले असून पाकमध्ये ऐलान ए जंग सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या पंजगुर, सुरब, केच आणि खारनसहीत अनेक जिल्ह्यात एकूण 17 स्फोट करण्यात आले आहेत. या स्फोटाने पाकिस्तान हादरून गेलं असून बलूचिस्तान लिबरेनशन फ्रंट (बीएलएफ)ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
पाकिस्तानमध्ये एवढे हल्ले झाल्यानंतरही पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत नुकसानीची माहिती दिलेली नाही. पण स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रभावित परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. कथित सैन्याच्या चौक्या, प्रशासकीय कार्यालयांवर हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
नवी पहाट
बीएलएफचे प्रवक्ते मेजर गुआराम बलूच यांनी या मोहिमेला बलूच राष्ट्रीय मुक्ती संग्रामाची नवी पहाट म्हटलं आहे. ही मोहीम मकरान तटीय परिसरापासून ते डोंगराळ भाग असलेल्या कोह-ए-सुलेमान पर्वत रांगांपर्यंत पसरलेली आहे. आम्ही केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक लोक मारले गेले आहेत. तसेच पाकचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. हे नुकसान व्हावं म्हणून आम्ही आमची मोहीम आखली होती, असा दावा गुआराम बलूच यांनी केला आहे.
प्रतिकाराने एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. बलुच लढवय्ये मोठ्या भागात मोठ्या प्रमाणात, समन्वित मोहिमा राबविण्यास सक्षम आहेत हे दाखवणेच या ऑपरेशन बामचा उद्देश आहे, असं मेजर गुआराम यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. ऑपरेशन संपल्यानंतर बी. एल. एफ. ऑपरेशनच्या परिणामांबद्दल अधिक माहिती गोळा करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
बलुचबहुल प्रांतात सुरू असलेल्या अशांतता आणि फुटीरतावादी तणावाकडे लक्ष वेधणारे हे हल्ले अलीकडच्या वर्षांत बी. एल. एफ. ने केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहेत. बलुचिस्तानच्या संसाधनांचा गैरवापर करून तेथील लोकांना मूलभूत अधिकार आणि स्वायत्ततेपासून वंचित ठेवल्याचा आरोप बी. एल. एफ. ने बऱ्याच काळापासून पाकिस्तानी सरकारवर केला आहे. सुरक्षा दलांनी लक्ष्यित जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरू केली असून बुधवारी सकाळपर्यंत केच आणि पंजगुरच्या काही भागात संपर्क तुटला होता.
ऑपरेशन बाम या प्रदेशातील बंडखोरांची वाढती क्षमता प्रतिबिंबित करते आणि पाकिस्तानच्या नैऋत्य प्रांतातील अस्थिर सुरक्षा वातावरणाकडे निर्देश करते, जिथे गेल्या दोन दशकांमध्ये सशस्त्र बंडखोरी आणि सरकारी दडपशाहीचे अनेक चक्र पाहिले गेले आहे.