Sanjay Shirsat Video : ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी समोर आणलेल्या एका व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी माध्यमांना एक व्हिडीओ दिला असून हा व्हिडीओ मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संबंधित आहे. या व्हिडीओत एक पैशाने भरलेली बॅग दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच संजय शिरसाट यांच्याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. पैशांनी भरलेली बॅग नेमकी आली कुठून? असा सवालही केला जातोय. यावरच आता समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ती बॅक पैशांनी भरलेली नाही. तिच्यात कपडे आहेत, असा दावा शिरसाट यांनी केलाय.
संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेची दोन शकलं झाली आहेत. एकनाथ शिंदे हे महायुतीत मजबुतीने उभे आहेत. आमचं काम चांगलं चालू आहे, असं शिरसाट यांनी म्हटलंय.
एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बेडवर बसलेले आहात. तिथे पैशांनी भरलेली बॅग आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याबाबत तुमचं नेमकं काय मत आहे? असा प्रश्न पत्रकारांनी शिरसाट यांना विचारला. यावर बोलताना मी तो व्हिडीओ नुकताच पाहिला. व्हिडीओत जे घर दिसतंय ती माझी बेडरुम आहे. मी बनियनवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठूनतरी प्रवास करून आलो आहे. मी कपडे काढले आहेत आणि मी बेडवर बसलो आहे, असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं.
तसेच एवढे सारे पैसे मी बॅगमध्ये कसे ठेवेन. घरातील अलमाऱ्या मेल्या आहेत का? एवढे सारे पैसे असते तर मी ते अलमारीमध्ये ठेवले असते. त्यांना पैशांशिवाय काहीही दिसत नाही. एकनाथ शिंदे विमानातून उतरले होते. त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या हातात काही बॅग होत्या. या बॅगमध्येही पैसे आहेत, असा दावा विरोधकांकडून केला जातो. माझ्या बेडरूमध्ये प्रवासातून आणलेली बॅग आहे, असा दावाही शिरसाट यांनी केला.
दरम्यान, राऊत यांनी समोर आणलेल्या व्हिडीओमधील बॅगमध्ये पैसेच नाहीत, असा दावा केलाय. तसेच माझी बॅग ही कपड्यांनी भरलेली आहे, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. त्यामुळे आता राऊतांनी समोर आणलेल्या या व्हिडीओच्या बॅगबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. म्हणूनच या प्रकरणी पुढे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.