Pune News: गणेशोत्सवाआधी पुण्यातील ढोल-ताशा पथकांना आनंदाची बातमी, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Saam TV July 11, 2025 06:45 PM

पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे गणेशभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी फक्त राज्यातील किंवा देशातील नाही तर जगभरातील गणेशभक्त येत असतात. अशातच यावर्षी ढोल-ताशा पथकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पारंपारिक वाद्यांवर खटले होणार नाहीत, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी आहे. पारंपरिक वाद्यांवर यावर्षी खटले होणार नाहीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ढोल -ताशा महासंघ महाराष्ट्रच्यावतीने पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. यंदा पारंपारिक वाद्यांवर कोणतेही खटले होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यासारखी ढोल-ताशा पथके कुठेही नाहीत. पारंपरिक वाद्यांवर कोणत्याही प्रकारचे खटले नाहीत, तसे असतील तर ते नक्की थांबवू. यावर्षी पारंपरिक वाद्यांवर खटले होणार नाहीत असा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचा प्रातिनिधिक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात पार पडला. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पथकांनी आपला सराव लवकर सुरु करून रात्री १० पूर्वी बंद करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यामध्ये पारंपरिक वाद्यांचे मोठे योगदान आहे. कोणत्याही सांस्कृतिक महोत्सव व गणेश - नवरात्र उत्सव असो, त्यात होणारा या वाद्यांचा गजर वातावरणाला मोहरून टाकतो. त्यातील ढोल ताशांच्या गजराचे ते वाजवणाऱ्या पथकांचे विशेष आकर्षण आबालवृद्धांना असते. ही पारंपरिक वाद्य कायद्याच्या चौकटीत ही मान्य झाली असली तरी अचानकपणे सातारा पोलिस प्रशासनाकडून सराव सुरू केलेल्या पथकांना नोटीस बजविण्यात आल्या आहेत.

निर्जनस्थळी सराव करण्याच्या सूचना सातारा पोलिसांनी या नोटीसमध्ये केल्या आहेत. या पथकातील सदस्यांपुढे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी साताऱ्यातील विविध ढोल ताशा पथकांनी सरावाला प्रारंभ केला आहे. या सरावा दरम्यान काही भागातील नागरिकांना आवाजाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी ढोल ताशा पथकांना दक्षता घेण्याच्या सूचना वजन नोटीस बजावल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.