Pune News: विकासकामांना गती देण्यासाठी पुणे महापालिकेची 'वॉर रूम'; आयुक्तांचे थेट नियंत्रण असणार
esakal July 11, 2025 06:45 PM

पुणे : शहरातील प्रमुख विकासकामांना गती देण्यासाठी, त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने आता ‘वॉर रूम’ची स्थापना केली आहे. त्यावर आयुक्त नवलकिशोर राम यांचे थेट नियंत्रण असणार आहे.

जायका प्रकल्प, नदीकाठ विकास, समान पाणीपुरवठा योजना, कात्रज - कोंढवा व शिवणे - खराडी रस्ते विस्तार तसेच विविध उड्डाणपूल यांसारख्या सुमारे ३० प्रकल्पांचा यात समावेश आहे.

या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनासह ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य मिळाले आहे. मात्र, बहुतांश कामांची मुदत संपूनही ती रखडली असून, मुदतवाढ देऊनही प्रगती अत्यल्प आहे.

नवलकिशोर राम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व खात्यांची बैठक घेतली होती. त्यात प्रत्येक विभागाच्या प्रकल्पांची स्थिती काय आहे याची माहिती घेतली. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहेच, पण त्यांचा दर्जाही चांगला असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आयुक्तांनी महापालिकेच्या प्रमुख ३० ते ३२ महत्त्वाचे प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

प्रत्येक १५ दिवसांनी या ‘वॉर रूम’मध्ये प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. विशेष उपायुक्तांची या कामांसाठी नियुक्ती केली असून, संबंधित विभागांच्या नियमित बैठका घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

Bus Accident: ट्रेलरला धडक; बसचालकाचा मृत्यू, वाहकासह नऊ प्रवासी जखमी, लोणावळ्याजवळ अपघात विलंबामुळे नाराजी

रखडलेल्या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, महापालिकेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांकडून रखडलेले प्रकल्प आणि अडचणींचा सविस्तर आढावा घेतला असून, अडथळे दूर करून कामे मार्गी लावण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.