पुणे : ‘पीएमपी’ प्रशासनाने दरवाढ केल्यानंतर घटलेली प्रवासीसंख्या आता पुन्हा वाढत आहे. दैनंदिन प्रवासीसंख्या सुमारे ११ लाखांहून जास्त झाली असून, प्रवासी उत्पन्न एक कोटी ७४ लाख रुपयांपर्यंत पोचले आहे. पासधारक व ऑनलाइन तिकिटांचा समावेश केल्यास हे उत्पन्न दोन २ कोटी ४२ लाख रुपयांवर गेले आहे. येत्या काही दिवसांत अडीच कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचा ‘पीएमपी’चा प्रयत्न सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून ‘पीएमपी’ तोट्यात सुरू आहे. जूनमध्ये दर वाढल्यानंतर सरासरी उत्पन्न दोन कोटी १० लाख इतके झाले. उत्पन्न वाढविण्यासाठी अनावश्यक खर्च व बस फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण कमी करणे, फेऱ्या अधिकाधिक वाढवून प्रवासी संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाने सुमारे अडीच कोटी रुपये दैनंदिन उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू आहे. काही दिवसांत आम्ही हे उद्दिष्ट गाठू.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे