हिंसाचारासाठी शेख हसीनांना जबाबदार ठरवणाऱ्या 'त्या' ऑडिओवर अवामी लीगने काय दिली प्रतिक्रिया?
BBC Marathi July 11, 2025 07:45 PM
Getty Images बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना गेल्या वर्षी ऑगस्टपासून भारतात आहेत.

बांगलादेशात गेल्या वर्षी सत्ताबदल झाला. या सत्ताबदलानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांच्यावरील गंभीर आरोप, लीक ऑडिओ, पोलीस कारवाया आणि हंगामी सरकारच्या हालचाली याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत.

गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या आंदोलनांवर घातक कारवाई करण्याचा आदेश त्यावेळच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिला होता, असं नव्यानं समोर आलं आहे.

'बीबीसी आय'ने शेख हसीनांचा फोनवरून कारवाई करण्याचे आदेश देतानाचा तो ऑडिओ ऐकला आहे.

लीक झालेल्या ऑडिओमध्ये शेख हसीना आपल्या सुरक्षा दलांना आंदोलकांविरोधात 'प्राणघातक शस्त्रांचा वापर' करण्याची परवानगी देताना ऐकू येतात.

ऑडिओमध्ये शेख हसीना असंही म्हणतात की, 'सुरक्षा दलांना जिथे जिथे आंदोलक दिसतील, तिथे ते त्यांच्यावर गोळ्या झाडतील.'

बांगलादेशचे सरकारी वकील हे ऑडिओ रेकॉर्डिंग शेख हसीना यांच्याविरुद्ध महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून वापरण्याच्या तयारीत आहेत.

हसीना यांच्यावर मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपांखाली एका विशेष न्यायाधिकरणात त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवला जात आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या आंदोलनांदरम्यान 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर शेख हसीना भारतात आल्या. त्यांच्या अवामी लीग पक्षाने हसीनांविरुद्ध करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

हसीना यांच्या 'अवामी लीग'कडून प्रत्युत्तर

दरम्यान, अवामी लीग पक्षानं शेख हसीना यांच्या लीक झालेल्या ऑडिओवरून सुरू असलेल्या वादावर आपली बाजू मांडली आहे.

पक्षाच्या प्रवक्त्यानं शेख हसीना यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

ऑडिओत कोणताही बेकायदेशीर हेतू असल्याचे संकेत नाहीत आणि 'कोणतीही अतिरेकी कारवाई' झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं.

Getty Images 1971 च्या युद्धानंतर बांगलादेशात झालेला हा सर्वात मोठा हिंसाचार होता.

एका अज्ञात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यासोबत शेख हसीना यांच्यातील चर्चेचा लीक ऑडिओ हा त्यांच्या विरोधातला आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

या ऑडिओवरून स्पष्ट होतं की, त्यांच्या सरकारनं आंदोलकांवर थेट गोळीबार करण्याची परवानगी दिली होती.

हे आंदोलन 1971 च्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेल्यांच्या नातेवाईकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सुरू झालं होतं.

पुढे हे आंदोलन मोठं झालं आणि अखेरीस 15 वर्षं पंतप्रधानपदावर असलेल्या शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं होत. 1971 च्या युद्धानंतर बांगलादेशातील हा सर्वात भीषण हिंसाचार होता.

पाच ऑगस्टचा हिंसाचार

5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशात हिंसाचार शिगेला पोहोचला होता. त्याच दिवशी, ढाका येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानावर जमावाने हल्ला करण्यापूर्वी हसीना हेलिकॉप्टरमधून तेथून पळून गेल्या.

'बीबीसी'च्या तपासणीत ढाकामध्ये आंदोलकांवर पोलिसांच्या कारवाईचे नवीन तपशील समोर आले आहेत. या माहितीनुसार मृतांचा आकडा आधी सांगितल्यापेक्षा खूप जास्त होता.

लीक झालेल्या ऑडिओची माहिती असलेल्या एका सूत्राने 'बीबीसी'ला सांगितलं की, 18 जुलै रोजी झालेल्या या संभाषणादरम्यान शेख हसीना या ढाका येथील आपल्या अधिकृत निवासस्थानी (गणभवन) होत्या.

Getty Images गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशात हिंसाचार शिगेला पोहोचला होता.

हे आंदोलनाचं एक निर्णायक वळण होतं. 'बीबीसी'नं पाहिलेल्या पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, या फोन कॉलनंतरच्या काही दिवसांत ढाकामध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरोधात रायफल्सचा वापर केला.

'बीबीसी'नं ज्या रेकॉर्डिंगची तपासणी केली आहे, ते शेख हसीनांशी संबंधित अनेक कॉल्सपैकी एक आहे. हे कॉल्स बांगलादेशच्या राष्ट्रीय दूरसंचार निगराणी केंद्राने (एनटीएमसी) रेकॉर्ड केले होते. ही संस्था देशातील संवाद व्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणांपैकी एक आहे.

या कॉलचा ऑडिओ यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला लीक झाला होता, पण तो नेमका कुणी लीक केला हे स्पष्ट नाही.

आंदोलनांनंतर शेख हसीनांच्या अनेक कॉल्सच्या क्लिप्स ऑनलाइन समोर आल्या आहेत, पण त्यापैकी अनेक ऑडिओंची खात्री करता आलेली नाही.

18 जुलैचे जे रेकॉर्डिंग लीक झालं आहे, ते बांगलादेश पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं शेख हसीनांच्या आवाजाशी जुळवून पाहिलं आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

'बीबीसी'नं हे रेकॉर्डिंग ऑडिओ फॉरेन्सिक तज्ज्ञ संस्था 'इअरशॉट'सोबत शेअर करून स्वतंत्र तपासणी केली. तपासणीत हे संभाषण एडिट करण्यात आल्याचे किंवा त्यामध्ये कोणतीही छेडछाड झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

'इअरशॉट'च्या म्हणण्यानुसार, हे रेकॉर्डिंग बनावट असण्याची शक्यता फारच कमी आहे आणि ती कदाचित अशा खोलीत रेकॉर्ड झाली असावी, जिथे फोन कॉलच्या वेळी स्पीकर ऑन होता.

संपूर्ण रेकॉर्डिंगदरम्यान इलेक्ट्रिक नेटवर्क फ्रिक्वेन्सी (इएनएफ) देखील आढळून आल्याचे 'इयरशॉट'ने सांगितलं.

Getty Images निदर्शकांनी हिंसाचाराने प्रत्युत्तर दिले होते.

ही फ्रिक्वेन्सी रेकॉर्डिंग डिव्हाइसभोवती असलेल्या इतर उपकरणांमुळे निर्माण होते. यामुळे हेही स्पष्ट होतं की, ऑडिओमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही.

'इअरशॉट'ने शेख हसीनांच्या बोलण्याची लय, आवाजातील चढ-उतार आणि श्वास घेण्याचा आवाज यांचंही विश्लेषण केलं. त्यांनी रेकॉर्डिंगमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या पाठीमागील शब्दांचंही (बॅकग्राऊंड नॉईज) परीक्षण केलं. तपासणीत ऑडिओशी कोणतीही छेडछाड झाल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत.

ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वकील टोबी कॅडमॅन हे बांगलादेशातील इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रायब्युनलला (आयसीटी) सल्ला देत आहेत. आयसीटी शेख हसीना आणि इतरांविरुद्धच्या खटल्यांची सुनावणी करत आहे.

टोबी कॅडमॅन यांनी 'बीबीसी'ला सांगितलं, "या प्रकरणात शेख हसीनांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे रेकॉर्डिंग्स खूप महत्त्वाचे आहेत. ते (रेकॉर्डिंग) स्पष्ट आहेत आणि योग्य रीतीने प्रमाणित करण्यात आले आहेत. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे पुरावे आहेत."

"'बीबीसी' जे टेप रेकॉर्डिंग्ज सांगत आहे, ते विश्वासार्ह आहेत की नाही, याची आम्ही पुष्टी करू शकत नाही," असं अवामी लीगच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

पोलीस कारवाईत किमान 52 जणांचा मृत्यू

शेख हसीना यांच्यासोबतच माजी सरकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही आंदोलकांच्या हत्येप्रकरणी जबाबदार धरण्यात आलं आहे.

आयसीटीने एकूण 203 जणांवर आरोप ठेवले आहेत, ज्यापैकी 73 जण सध्या कोठडीत आहेत. 'बीबीसी आय'ने 36 दिवसांमध्ये आंदोलकांविरोधात पोलिसांनी केलेल्या हल्ल्यांचे तपशील देणारे शेकडो व्हीडिओ, फोटो आणि कागदपत्रांचे विश्लेषण आणि पडताळणी केली आहे.

तपासणीत असं निष्पन्न झालं की, गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी ढाक्याच्या गजबजलेल्या जत्राबारी परिसरात झालेल्या एका घटनेत पोलिसांनी किमान 52 लोकांची हत्या केली.

ही घटना बांगलादेशाच्या इतिहासातील पोलीस हिंसाचारातील सर्वात वाईट घटना मानली जाते.

जत्राबारीत त्या दिवशी 30 लोकांचा मृत्यू झाला होता, असं त्यावेळच्या सुरुवातीच्या अहवालात सांगण्यात आलं होतं.

Getty Images जत्राबारी येथील घटनेत पोलीस कारवाईत किमान 52 जणांचा मृत्यू झाला.

'बीबीसी'च्या तपासणीत या हत्याकांडाची सुरुवात आणि शेवट याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

'बीबीसी आय'ने प्रत्यक्षदर्शींनी घेतलेले फुटेज, सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे घेतलेले फोटो एकत्र करून असा निष्कर्ष काढला की, जेव्हा सैन्य दलानं ते ठिकाण सोडलं, तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर अंदाधुंद गोळीबार केला.

जेव्हा आंदोलक गल्लीबोळ आणि महामार्गावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर तब्बल 30 मिनिटांहून अधिक वेळ गोळीबार केला.

त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जवळच्याच एका लष्करी छावणीत आश्रय घेतला. काही तासांनी आंदोलकांनी प्रत्युत्तर दिलं आणि जत्राबारी पोलीस ठाण्याला आग लावली, ज्यामध्ये किमान सहा पोलीस अधिकारी ठार झाले.

गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या हिंसाचारातील पोलिसांच्या भूमिकेप्रकरणी 60 पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती, असं बांगलादेश पोलिसांच्या प्रवक्त्यानं 'बीबीसी'ला सांगितलं.

"त्या काळात काही पोलिसांनी बळाचा जास्त वापर केला, त्यामुळे दुर्दैवी घटना घडल्या. या प्रकरणात बांगलादेश पोलिसांनी सखोल आणि पारदर्शक चौकशी सुरू केली आहे," असं प्रवक्त्यांनी सांगितलं.

अवामी लीग निवडणूक लढवू शकेल की नाही?

शेख हसीना यांच्यावरचा खटला गेल्या महिन्यात सुरू झाला आहे. त्यांच्यावर मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचा आरोप आहे. यामध्ये सामूहिक हत्या आणि सामान्य नागरिकांविरुद्ध हिंसक कारवाईचे आदेश देण्याचा समावेश आहे.

याशिवाय, त्यांना ही हत्या रोखण्यात अपयश आल्याचं, कट रचल्याचं आणि लोकांना चिथावणी दिल्याचेही आरोप आहेत.

बांगलादेशने शेख हसीनांना परत पाठवण्याची (प्रत्यार्पणाची) मागणी भारताने अद्याप मान्य केलेली नाही. कॅडमॅन यांनी सांगितलं की, हसीना खटल्यासाठी बांगलादेशात परत येण्याची शक्यता फारच कमी आहे.

अवामी लीगचं म्हणणं आहे की, आंदोलकांवर बळाचा वापर करण्यात त्यांच्या नेत्यांचा काहीही सहभाग नाही.

Getty Images बांगलादेशमध्ये आता मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार आहे.

"पंतप्रधानांसह आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्राणघातक बळ वापरण्याचे आदेश दिले, हा दावा आम्ही ठामपणे फेटाळतो," असं अवामी लीगच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.

"वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन योग्य हेतूने निर्णय घेतले होते आणि त्यामागचा उद्देश जिवितहानी टाळणं हाच होता."

संयुक्त राष्ट्राचा 'तो' तपास अहवालही अवामी लीगने फेटाळला आहे, ज्यामध्ये म्हटलं होतं की, शेख हसीना आणि त्यांच्या सरकारच्या काही कृती 'मानवतेविरुद्धचे गुन्हे' मानलं जाऊ शकतात.

'बीबीसी'ने प्रतिक्रियेसाठी बांगलादेश लष्कराशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर बांगलादेशात नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार आहे.

युनूस यांच्या सरकारकडून राष्ट्रीय निवडणुकांची तयारी सुरू आहे. पण, अवामी लीगला निवडणूक लढण्याची परवानगी मिळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • 'आंदोलक दिसले की गोळ्या घाला', शेख हसीनांचा आदेश, लीक झालेल्या ऑडिओतून समोर आलं सत्य
  • शेख हसीना : एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर, आता देश सोडून पळून जाण्याची वेळ, 'असा' आहे प्रवास
  • शेख हसीना वाजेद आणि खालिदा झिया; बांगलादेशातलं राजकारण या दोघींभोवतीच असं फिरत राहिलं
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.