Pune Metro : भूमिपूजन झाले, काम लटकले; प्रत्यक्ष कामास आणखी तीन महिने लागण्याची शक्यता
esakal July 11, 2025 07:45 PM

पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन केलेल्या स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यासाठी आणखी किमान तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे भूमिपूजनानंतर तब्बल एक वर्षाने या मार्गाचे काम सुरू होण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारने पिंपरी चिंचवड-निगडी या विस्तारित मार्गापाठोपाठ स्वारगेट-कात्रज या मेट्रो मार्गाला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मंजुरी दिली. त्यानंतर लगेचच म्हणजे २९ सप्टेंबर रोजी स्वारगेट-महात्मा फुले मंडई या भूमिगत मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याच वेळी स्वारगेट-कात्रज या एलिव्हेटेड मेट्रो मार्गाचे भूमिपूजन ऑनलाइन झाले. मात्र, या मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

या बाबत पुणे मेट्रोकडे विचारणा केल्यावर, या मार्गाचे काम कोणाला द्यायचे, याबाबत लवकरच निविदा समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर प्रकल्पासाठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांची मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल. या प्रक्रियेसाठी आणखी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आले.

व्यापारी संकुलासाठी पुन्हा निविदा

पुणे मेट्रोच्या स्वारगेट येथील ट्रान्स्पोर्ट हबमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत, सहकारी व खासगी बॅंका, थिएटर, मॉल, शो-रूम, हॉस्पिटल, कार्यालये आदींचा त्यात समावेश असेल. स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या वर सहा मजली हे संकुल असेल. त्यात वाहने उभी करण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध असेल. त्यासाठी पुणे मेट्रोने दोन वेळा निविदा काढल्या. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार आहे.

पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते निगडी या विस्तारित मार्गांसाठी तीन डबे असलेल्या बारा मेट्रोची मागणी नोंदविली आहे. यामुळे या विस्तारित मार्गिकेचे बांधकामाचे पूर्ण झाल्यानंतर लगेच मेट्रो सेवा पुरवणे शक्य होणार आहे. यामुळे पीसीएमसी ते निगडी या मार्गातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

महत्त्वाचे

या मार्गावर, ही स्थानके असणार

  • स्वारगेट

  • सिटी प्राइड

  • बिबवेवाडी

  • पद्मावती

  • बालाजीनगर

५.४६ किलोमीटरच्या मार्गासाठी ३ हजार ६४७ कोटी रुपये खर्च येणार

काम सुरू झाल्यावर चार वर्षांत पूर्ण होणार

सध्या सुरू मेट्रोबाबत
  • दररोजचे सरासरी प्रवासी - एक लाख ८० हजार

  • दररोजचे सरासरी उत्पन्न- ३३ लाख रुपये

मेट्रोकडे ३० नवे डबे येणार

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच स्वारगेट ते कात्रज मार्गाच्या बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी नवीन १२ मेट्रो ट्रेनची आवश्यकता भासणार आहे. प्रत्येक मेट्रो ट्रेनला तीन डबे असतील. हे डबे पुढील ३० महिन्यांत टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.

पुणे मेट्रोने ‘टीटागढ रेल सिस्टिम लिमिटेड’ आणि ‘टीटागढ फिरेमा’ या दोन्ही कंपन्यांना मिळून या १२ नवीन मेट्रो ट्रेनच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. या नवीन मेट्रो ट्रेन संपूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात येणार असून पूर्वीच्या मेट्रो ट्रेनप्रमाणे अल्युमिनियमपासून तयार करण्यात आले आहेत.

या खरेदी कराराची एकूण रक्कम ४३०.५३ कोटी रुपये इतकी आहे. या नवीन १२ ट्रेन सध्या मेट्रोच्या ताफ्यात असणाऱ्या ट्रेन सारख्याच असतील. संपूर्णतः वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे, स्वयंचलित उद्घोषणा व डिस्प्ले, चार्जिंग पॉइंट आदींचा त्यात समावेश असेल. या १२ नवीन ट्रेन दाखल झाल्यावर पुणे मेट्रोच्या ट्रेन्सची संख्या ४६ ट्रेन (३४ सध्याच्या ट्रेन आणि १२ नवीन ट्रेन) होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.