उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीवारी केली. त्यावर आज उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी घणाघात घातला. काल गुरू पौर्णिमेनिमित्त त्यांनी त्यांचे गुरू अमित शाह यांचे पाद्यपूजन केले. त्यांच्या पायावर डोके ठेवल्याचा टोला त्यांनी लगावला. त्यांचा दिल्ली दौरा त्यासाठीच होता असा खोचक टोला राऊतांनी लगावला. शहा यांच्यामुळेच शिवसेनेत फूट पडल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
शिंदेंनी फडणवीसांची शहांकडे तक्रार केली
एकनाथ शिंदे हे काल दिल्लीवारीवर असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. फडणवीस हे आमची अडचण करत आहेत, ते आम्हाला काम करू देत नाहीत असा ते म्हणाल्याचा चिमटा राऊतांनी काढला. सध्या राज्यात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहे. मराठी माणसाची एकजूट झाली यावर दोघांची चर्चा झाली.
मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय
तर शिंदेंनी या चर्चेदरम्यान स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की, महाराष्ट्रात मराटी माणसांची एकजूट झाली आहे. ती अधिकाधिक भक्कम होईल. त्याचा त्रास आम्हाला होईल. मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, यावर दोघांमध्ये खल झाला. मराठी माणसाची एकजूट तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठे नुकसान होईल, असे शिंदेंनी सांगितल्यावर अमित शहा यांनी त्यांना त्यावर तोडगा काय असे विचारले. त्यावर मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा इलाज असल्याचे शिंदे म्हणाल्याचा दावा संजय राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. अमित शाह यांनी मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल असे सांगितले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपण आपल्या गटासह भाजपामध्ये विलीन होण्यास तयार असल्याचे शिंदे म्हणाल्याचा दावा राऊतांनी केला.
शिंदे यांच्या जवळच्या लोकांवर कारवाई
मंत्री संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना ईडीची नोटीस आल्याचे वृत्त आले आणि नंतर त्याचे खंडन झाले. यावर खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. लवकरच शिंदे यांच्या जवळच्या लोकांवर कारवाई होईल असा दावा राऊतांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती खास पुरावे लागले आहेत. तर दिल्लीत शिंदे यांच्या पाठीशी असणाऱ्या शक्ती कमकुवत होत असल्याचा दावा त्यांनी केला. सत्तेचे संरक्षण तात्पुरते असते. दिल्लीतील संरक्षक जस जसे कमकुवत होतील, तेव्हा तपास यंत्रणा त्यांच्याकडील फाईल उघडतात असा दावा राऊतांनी केला.