यूपीआय वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची अपडेट, 1 ऑगस्टपासून नवे नियम लागू होणार, NPCI चा मोठा निर्णय
Marathi July 11, 2025 08:25 PM

यूपीआय नवीन नियम नवी दिल्ली: ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्ही जर फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम सारख्या अॅपद्वारे यूपीआयचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑगस्टपासून नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून नवे नियम लागू केले जाणार आहेत. यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांबाबत काही गोष्टी बदलल्या जाणार आहेत.

नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नव्या API  नियमांना बँक आणि पेमेंट सर्व्हिस प्रोवायडर्स साठी लागू करेल. याचा हेतू यूपीआय यंत्रणेला अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याचा आहे. याशिवाय सर्व्हर डाऊन या सारख्या गोष्टींपासून बचाव करण्याचा प्रयत्न देखील असेल.

1 ऑगस्टपासून कोणत्या गोष्टी बदलणार?

येत्या 1 ऑगस्टपासून यूपीआय अॅपवरुन एका दिवसात 50 वेळा खात्यातील शिल्लक रक्कम तपासता येईल. यामुळं वारंवार होणारे API कॉल्स कमी होतील, यंत्रणेवर ताण येणार नाही.  याशिवाय मोबाईल नंबर किती बँक अकांऊटशी जोडलेला आहे ही माहिती एका दिवसात 25 वेळा तपासता येईल.

ऑटोपेसाठी वेळ निश्चित

नेटफ्लिक्स,एसआयपी या सारख्या ऑटो डेबिट पेमेंटस हे नॉन पीक टाईममध्ये होतील. सकाळी 10, दुपारी 1 ते 5 दरम्यान आणि रात्री 9.30 वाजल्यानंतर ऑटो डेबिट पेमेंटस होतील.

एखादं पेमेंट अडकलं असल्यास त्याची स्थिती 3 वेळा तपासली पाहिजे. स्थिती तपासण्यामध्ये किमान 90 सेंकदांचं अंतर असणं आवश्यक आहे.

NPCI चे सतर्कतेचे आदेश

डिजिटल पेमेंट फ्रॉड आणि फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. अधिकृत आणि ओळखीच्या अॅप आणि वेबसाईटचा वापर करावा. कोणत्या अनोळखी व्यक्तीकडून पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करु नका, त्यावरुन अॅप डाऊनलोड करु नका. APK फाईल्स, एसएमएस किंवा सोशल मीडियावरुन आलेल्या लिंकवर क्लिक करु नका. पेमेंट करण्यापूर्वी ज्याला पैसे पाठवत आहात त्या व्यक्तीच्या नावाची खात्री करुन घ्या. यूपीआय पिन किंवा ओटीपी कोणासोबत शेअर करु नका. यूपीआय पिन, ओटीपी किंवा बँक डिटेल्स यासारख्या गोपनीय गोष्टी कोणाला सांगू शकत नाही. एसएमएस आणि अॅप नोटिफिकेशन चालू ठावे. प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळेल.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.