आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आता फक्त काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये ही स्पर्धा होणार असून यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार असून आतापर्यंत 15 संघ पात्र ठरले आहेत. नुकतीच आयसीसी पुरुष टी20 वर्ल्डकप युरोप पात्रता 2025 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नेदरलँड आणि इटलीने जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही संघ गुणतालिकेत टॉपला राहीले त्यामुळे त्यांचं स्थान निश्चित झालं आहे. इटली संघाने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. इटलीच्या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला तो जो बर्न्स. त्याने संघाचं नेतृत्व योग्य पद्धतीने पार पाडलं. जो बर्न्स काही वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. त्याने 23 कसोटी आणि सहा वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत बर्न्सने 36.97 च्या सरासरीने 1442 धावा केल्या आहेत. यात 4 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये 146 धावा आहेत.
भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज , कॅनडा आणि यूएसए यांनीही या स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. टी20 रँकिंगच्या आधारे आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांनीही या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. आता आफ्रिका पात्रता फेरीतून दोन संघ आपले स्थान निश्चित करतील. ही स्पर्धा नामिबिया, युगांडा, केनिया, झिम्बाब्वे, नायजेरिया, टांझानिया, मलावी आणि बोत्सवाना यांच्यात होईल. तर आशियाई-ईएपी पात्रता फेरीतून तीन संघ पात्र ठरतील. ही स्पर्धा 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, कुवेत, मलेशिया, जपान, कतार, सामोआ आणि युएई यांच्यात होईल.
कॅनडाने अमेरिका पात्रता स्पर्धेत बहामासचा पराभव करून विजय मिळवला आणि पात्र ठरला. कॅनडाने अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरीतील सर्व पाच सामने जिंकले. कॅनडा भारतात दुसरा वर्ल्डकप खेळणार आहे. यापूर्वी कॅनडाने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी देखील पात्रता मिळवली होती.