राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. अशातच आता जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार नाहीत
आमदार रोहित पवार म्हणाले की, ‘जयंत पाटील साहेब, पवार साहेब, सुप्रियाताईंनी ठरवलं की बदल झाले पाहिजे. त्यानुसार त्यांनी बदल केले आहेत. याबाबत पवारसाहेब, सुप्रियाताईंची बैठक झाली होती. आता राजीनामा दिला म्हणून जयंत पाटील बीजेपीमध्ये जातील असं नाही, कारण आतापर्यंत ते साहेबांसोबत राहिले आहेत. सत्तेसाठी ते जाणार नाहीत.’
प्रदेशाध्यक्ष पदाबाबत रोहित पवार काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष पदाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘पक्ष माझ्या ताब्यात द्या असं बोललो मी नाही. आजच्या राजकारणात, अनुभवी आणि तरुण नेते असतील तर खेळायलाही मजा येते. मी पक्षाची भूमिका मांडत आहे, येणाऱ्या काळात मी पक्षात असणार आहे. त्या पदाची मी कधीच अपेक्षा केली नाही, प्रदेशाध्यक्ष पद मिळवणे माझं टार्गेट नव्हतं, मला पक्षात एखादं छोटं पद मिळेल आणि मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल.’
जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे भाष्य
जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर बोलताना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना निर्णय घेते तेव्हा पक्षातील अध्यक्ष बदलत असतात. भाजपमध्ये आता रवींद्र चव्हाण अध्यक्ष झाले, मी आतापर्यंत होतो, ही प्रक्रिया आहे ते नवीन नाही, जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. ही त्यांच्या पक्षाची प्रक्रिया असेल मला यात फार राजकारण दिसत नाही.’
जयंत पाटलांना या पक्षाकडून ऑफर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘जयंत पाटील अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं स्वागतच करतील. जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नसताना अनेक वेळा त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. जयंत पाटील हे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ आहेत असं बोललं जायचं, अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.’