राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच केलेल्या एका विधानाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. वयाचे 75 वर्ष पूर्ण झाले की इतरांना संधी दिली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. भागवतांच्या याच विधानाचा संदर्भ घेत काँग्रेस पक्षाकडून पतंप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला जातोय. दरम्यान, मोहन भागवत यांच्या याच विधानावर अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते बोरीवलीत आयोजित करण्यात आलेल्या एका सत्संगाच्या कार्यक्रमात बोलत होते.
काँग्रेसला नरेंद्र मोदींचे स्वप्न पडते. तुम्ही काहीही म्हणा, त्यांना फक्त नरेंद्र मोदीच दिसतात. मोहन भागवत स्वतःबद्दल बोलत असण्याची शक्यता आहे. कारण तेदेखील 75 वर्षांचे होणार आहेत, असे मत शंकराचार्यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. यावरही शंकराचार्य यांनी प्रतिक्रिया दिलीय. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे गौरव आहेत. ते हिंदूंचे गौरव आहेत. त्याच्याशी संबंधित जे काही आहे ते आपल्या सर्वांसाठी एक वारसा आणि आदरणीय आहे, असं शंकराचार्य म्हणाले. तसेच त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचा जागतिक स्तरावर सन्मान होत असेल तर ती चांगली बाब असल्याचेही ते म्हणाले.
मोहन भागवत यांच्या हस्ते नुकतेच मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर लिहिलेल्या “द आर्किटेक ऑफ हिंदू रिसर्जन्स” या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. मंदार मोरोने आणि प्रांजली काने या द्वयींनी हे पुस्तक साकारलेले आहे. याच पु्स्तक प्रकाशनाच्या काळात मोहन भागवत बोलत होते. बोलत असताना त्यांनी आपल्या भाषणात वयाच्या 75 वर्षांचा उल्लेख केला. जेव्हा 75 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणत्याही नेत्यास शाल दिली जाते, तेव्हा त्याचा एक अर्थ असतो. त्याचा अर्थ म्हणजे त्याचे आता वय झाले आहे. तुम्ही इतरांना संधी दिली पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले होते.