युद्धबंदीनंतर इराणचा ‘या’ देशाला दणका, 5 लाख लोकांची केली हकालपट्टी
GH News July 12, 2025 07:05 PM

इस्रायलविरुद्धच्या युद्धानंतर इराणमधील परिस्थिती सुधारताना दिसत आहे. इराण युद्धात झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता इराणने अफगाणी नागरिकांवर कठोर कारवाई केल्याचे समोर आले आहे. गेल्या 16 दिवसांमध्ये 5 लाखांहून अधिक अफगाणी नागरिकांना इराणमधून हाकलून देण्यात आले आहे. हे या दशकातील जबरदस्तीने केलेले सर्वात मोठे विस्थापन मानले जात आहे.

इराणने 5 लाखांहून अधिक अफगाणी नागरिकांना हाकलले

समोर आलेल्या माहितीनुसार, इराणने 24 जून ते 9 जुलै या कालावधीत 5 लाख 8 हजारांहून अधिक अफगाण नागरिकांना देशाबाहेर काढले आहे. काही दिवसांपूर्वी इराणमधून एका दिवसात 51 हजार अफगाणी लोकांना हाकलून लावण्यात आले होते. इराणने कागदपत्रे नसलेल्या अफगाण नागरिकांनी देश सोडावा असे आवाहनही केले होते.

अफगाणी लोक कमी पगारावर करतात काम

इराणने याआधीही देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाण नागिकांना देश सोडण्यास सांगितले होते. हे अफगाणी लोक इराणमध्ये कमी वेतनावर कामगार म्हणून काम करतात. अफगाणी लोक तेहरान, मशहाद आणि इस्फहान या शहरांमध्ये बांधकाम कामगार, साफसफाई कामगार म्हणून आणि शेतात काम करतात. मात्र आता या कामगारांना मायदेशात परतावे लागले आहे. अफगाणिस्तानमध्ये आधीच बेराजगारी आहे, त्यामुळे आता या नागरिकांना पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

इराणने अफगाणी नागरिकांवर गंभीर आरोप केला आहे. ‘काही अफगाण नागरिक इस्रायलसाठी हेरगिरी करत होते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक आहे असं इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एक व्हिडिओत एक अफगाणी तरुण जर्मनीमध्ये बसलेल्या हँडलरला काही ठिकाणांची माहिती देत असल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. मात्र या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

इराणवर टीका

अनेक मानवाधिकार संघटनांनी असे म्हटले आहे की, इराण या हेरगिरीच्या संशयावरून अफगाणी नागरिकांना देशाबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र आता त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. इराणी सरकारने कमकुवत आणि शोषित समुदाय असलेल्या अफगाणांना टार्गेट केल्याचा आरोप केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.