>> प्रांजल वाघ
मुंबईपासून अगदी जवळ निसर्गाच्या कुशीतला आडवाटेचा असा ताहुलीचा डोंगर आणि याच ताहुलीच्या पोटात आहे वाघबीळचा अद्भुतरम्य धबधबा! कडय़ावरून कोसळणारा पांढराशुभ्र प्रपात आणि त्या पाण्याच्या पडद्याआड लपलेलं, हवा आणि पाणी यांच्या शतकांच्या माऱयामुळे पाषाणाची झीज होऊन निर्माण झालेलं, निसर्गाचा आविष्कार असलेलं हे एक विवर.
अनेक महिन्यांनी सह्याद्रीत भटकंती करण्याचा योग गेल्या आठवडय़ात जुळून आला. मे महिन्याच्या अखेरीस वळिवाचा पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत असताना जवळच असलेला छोटेखानी भिवगड पाहून झाला होता. आता उन्हाच्या काहिलीपासून जरा आराम मिळण्यासाठी आम्हाला पावसात चिंब भिजायचं होतं. सह्याद्रीच्या डोंगरातील जंगलाचा आनंद लुटायचा होता. मग आम्ही निवडली एक थोडीशी आडवाटेला असलेली जागा – वाघबीळ!
बदलापूरला रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर पूर्वेस बाहेर पडायचं. स्टेशनवरून तुम्ही सावरोली गावासाठी रिक्षा घेऊ शकता. स्वतचे वाहन असल्यास सर्वात सोयिस्कर आणि उत्तम! सावरोली गाव बदलापूरच्या नैऋत्येस वसलेले एक छोटेसे. सह्याद्रीतील ताहुली डोंगराच्या कुशीतल्या दाट जंगलाची हिरवी गोधडी पांघरून गुडूप झोपलेलं! इथल्या डांबरी सडकेवर रिक्षा आपल्याला सोडते. लगेच डावीकडे आपल्याला झेडपीची शाळा दिसते. त्याच्या बाजूनेच एक छोटासा रस्ता नदीकडे जातो. त्या रस्त्याला लागून चालताच पाच मिनिटांत आपण ओढावजा नदीपाशी पोहोचतो. ती पायीच ओलांडून जंगलात जाणारी ठळक आणि रमलेली वाट आपल्याला लागते आणि इथून खऱ्या ट्रेकची सुरुवात होते.
जंगल अधिक दाट होत जाते. चालता चालता आपण झाडावेलींनी तयार केलेल्या एका नैसर्गिक बोगद्यातून थोडासा चढ चढतो आणि अचानक समोर एक विस्तीर्ण पठार लागतं, तिथे आपल्यासमोर विश्वरूप दर्शन देत उभा असतो ताहुलीचा महाकाय आणि प्राचीन डोंगर. आपले दोन्ही बाहू पसरून तुम्हाला कवेत घेऊ पाहणारा! याच ताहुलीच्या पोटात आहे वाघबीळचा अद्भुतरम्य धबधबा!
इथून पुढे दाट जंगलातून वाट काढत दोन-तीन ओढे ओलांडत अचानकपणे आपण थबकतो. कोसळणाऱया धबधब्याची गाज आपल्या कानी पडू लागताच आपला चालण्याचा वेग वाढतो आणि अगदी काही क्षणात वाघबीळचा धबधबा नजरेस पडतो. कडय़ावरून कोसळणारा पांढराशुभ्र प्रपात आणि त्या पाण्याच्या पडद्याआड लपलेलं, हवा आणि पाणी यांच्या शतकांच्या माऱयामुळे पाषाणाची झीज होऊन निर्माण झालेलं, निसर्गाचा आविष्कार असलेलं एक विवर – वाघबीळ!
त्या विवराकडे जाणारी वाट मात्र शेवाळलेली आहे. त्यामुळे तिथे जाताना अत्यंत काळजीपूर्वक जाणे गरजेचे आहे. तसेच धबधब्यापर्यंत पोहोचायला लागणारे ओढे ओलांडताना पाण्याचा जोर बघूनच ते ओलांडावेत.
त्या विवरात प्रवेश करून आम्ही आतमध्ये पडणाऱ्या पाण्याच्या संततधारेखाली चिंब भिजून मन तृप्त करून घेतले आणि त्या धारांचा अभिषेक आपल्या मस्तकी करून घेतला. पाऊस आता वाढायला लागला होता. खालच्या ओढय़ांना पाणी वाढायच्या आत आम्ही परत फिरलो. वाघबीळच्या थंडगार आठवणी सोबत घेऊन झपाझप पाऊले टाकीत घराकडे निघालो.