ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून अण्वस्त्र हल्ला होणार होता का? शहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
GH News July 13, 2025 11:08 AM

Shehbaz Sharif on Pakistan Nuclear Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पाकिस्तानमधील राजकारण्यांकडून आमच्याकडे अण्वस्त्र असल्याची धमकी दिली जात होती. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यासंदर्भात प्रथमच वक्तव्य केले आहे. भारतासोबतच्या संघर्षादरम्यान अणुहल्ल्याची शक्यता शाहबाज शरीफ यांनी फेटाळली. ते म्हणाले, पाकिस्तानचा अणुकार्यक्रम कोणत्याही हल्ल्यासाठी नाही तर शांततापूर्ण हेतूंसाठी आणि स्वसंरक्षणासाठी आहे.

शाहबाज शरीफ काय म्हणाले?

इस्लामाबादमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले, आमचा अणुकार्यक्रम देशाच्या सुरक्षेसाठी आहे. आक्रमकतेसाठी नाही. त्याला हल्ल्याचे साधन मानणे चुकीचे आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या चार दिवसांच्या लष्करी तणावाचा संदर्भ देत ते म्हणाले, भारताच्या हल्ल्यात आमचे ५५ पाकिस्तानी नागरिक मारले गेले. परंतु पाकिस्तानने पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. त्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेली ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ या संघटनेने घेतली होती. त्यामुळे मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांची तळ नष्ट केली होती.

आसीम मुनीरबाबत म्हटले…

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना पदावरून हटवण्यात येणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे. झरदारी यांच्या जागी लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसीम मुनीर यांना राष्ट्रपती करण्याची योजना असल्याच्या बातम्या त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या. ते म्हणाले, आसिम मुनीर यांनी राष्ट्रपती बनण्याची इच्छा व्यक्त केली नाही. तसेच अशी कोणतीही योजना नाही. राष्ट्रपती झरदारी आणि आसिम मुनीर यांच्यात चांगले संबंध आहेत.

पाकिस्तानचे गृहमंत्री मोसिन नकवी यांनीही झरदारी आणि मुनीर यांच्यासंदर्भातील बातम्यांवर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, जे लोक या खोट्या बातम्यांना खतपाणी घालत आहेत ते परदेशी शत्रू एजन्सींशी संगनमत करत आहेत. पण आम्ही पाकिस्तानला पुन्हा मजबूत करण्यासाठी कटीबद्ध आहोत.

दरम्यान, फील्ड मार्शल असीम मुनीर यांना २०२२ मध्ये तीन वर्षांसाठी लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ सरकारने पाच वर्षांपर्यंत वाढवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.