भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या षटकापासून मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. त्याचा सामना करताना फलंदाज वारंवार चकवा खात होते. या दरम्यान त्याने दोन विकेटही काढल्या. काही एलबीडब्ल्यूचे निर्णय त्याच्या विरुद्धही गेले. पण दुसऱ्या सत्रात एक निर्णय असा आला की सिराजसह टीम इंडिया आणि क्रीडाप्रेमीही आवाक् झाले. इंग्लंडच्या डावातील 38व्या षटकात हा प्रकार घडला. मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जो रुटने पुढे येत खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला अपयश आलं आणि चेंडू पॅडवर आदळला. यानंतर भारतीय संघाने जोरदार अपील केली. सिराजने अपीलपूर्वीच या विकेटसाठी जल्लोष सुरु केला होता. पण ऑस्ट्रेलियाचा पंच पॉल रायफलने त्याला नाबाद असल्याचं घोषित केलं. यानंतर कर्णधार शुबमन गिलने डीआरएससाठी अपील केली. जेव्हा पहिला रिप्ले पाहीला तेव्हा भारतीय खेळाडू आणि चाहते खूश झाले. कारण चेंडू लाइनमध्ये पॅडवर लागला होता.
डीआरएस रिव्ह्यू भारताच्या बाजूने लागेल असं वाटत होतं. पण डीआरएस प्रोजेक्शन आलं तेव्हा भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. कारण चेंडू लेग स्टंपवर आदळला होता, पण त्याच्या बाहेरच्या भागाला घासून जात होता. त्यामुळे त्या पंचांचा कॉल घोषित केलं गेलं. तेव्हा पंच रायफलने तर नॉट आऊट घोषित केलं होतं. यामुळे त्याचा निर्णय कायम राहिला. असा निर्णय पाहून मोहम्मद सिराजच्या तळपायाची आग मस्तकात गेली. इतकंच काय तर कर्णधार शुबमन गिलही निराशा लपवू शकला नाही.
समालोचन करणारे सुनील गावस्कर देखील हा निर्णय पाहून आश्चर्यचकीत झाले. त्यांनी हा निर्णय फेटाळून लावत सांगितलं की, ‘असं होऊ शकत नाही’ गावस्करने डीआरबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं. त्यांच्या मते, डीआरएस प्रोजेक्शन बरोबर नव्हता कारण चेंडू स्टंपच्या इतक्या बाहेर जाताना दिसत नव्हता. तर इम्पॅक्टच स्टंपच्या लाइनमध्ये आहे तर इतक्या बाहेर कसा जाऊ शकतो. जो रूटला जीवदान मिळालं खरं पण जास्त काळ तग धरू शकला नाही. जो रूट 40 धावा करून वॉशिंग्टन सुंदरचा शिकार ठरला.