मोसादची डेंजर जासूस, इराणाला टाकलं संकटात? बुरखा घालून फिरणारी शकदम नेमकी कोण?
GH News July 14, 2025 09:18 PM

Iran Vs Israel : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता थांबलं आहे. पण युद्ध थांबलेलं असलं तरी या भागातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत असते. सध्या तेथे एका महिलेची चांगलीच चर्चा होत आहे. या ज्यू महिलेवर इराणमध्ये धक्कादायक आरोप करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे तिच्यावरील आरोप थेट संसदेत करण्यात आल्यामुळे आता तिची जगभरात चर्चा होत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार इराणच्या संसदेत खासदार मुस्तफा क्वाकबियान यांनी एका महिलेवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. इराणमध्ये इस्रायलची मोसाद ही गुप्तहेर संघटना चांगलीच सक्रिय आहे. याच संघटनेबाबत बोलताना या महिलेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही महिला ज्यू असून तिचे नाव कॅथरीन पेरेज शकदम असे आहे. तिच्यावर इराणविरोधात गुप्तहेर म्हणून काम केलंय, असा आरोप मुस्तफा यांनी केलाय. शकदम या स्वत:ला एक राजकीय विश्लेषक असलेल्या सांगतात. तर दुसरीकडे मुस्तफा यांनी शकदम यांचे इराणमधील साधारण 120 मोठ्या लोकांशी अवैध संबंध ठेवले आणि इराणविषयी हेगगिरी केली, असा आरोप केला आहे.

15 वर्षांत शकदम यांच्यावर वेगवेगळे आरोप

मुस्तफा यांच्या या गंभीर आरोपांनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. तर दुसरीकडे शकदम यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याआधीही गेल्या 15 वर्षांत शकदम यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले होते. शकदम मात्र वेळोवेळी मी फक्त राजकीय विश्लेषक आहे, असेच सांगत आल्या आहेत. 2022 साली त्यांनी बीबीसी फारशीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मी कोणत्याही देशासाठी गुप्तहेर म्हणून काम केलेले नाही, असे सांगितले होते. त्या काळात कॅथरीन या अनेक इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होत्या. याबाबतचे वृत्त त्यावेळी माध्यमांतही आले होते. मात्र माझे कोणत्याही अधिकाऱ्यांशी वैयक्तिक स्वरुपाचे संबंध नाहीत, असे त्यावेळीच त्यांनी स्पष्ट केले होते.

कॅथरीन शकदम कोण आहेत?

कॅथरीन शकदम या राजकीय विश्लेषक आहेत. मध्य-पूर्वेत घडणाऱ्या घडामोडींत त्यांना विशेष रस आहे. टाइम्स ऑफ इस्रायल या वृत्तपत्रात त्यांचे लेख नेहमी प्रसिद्ध होतात. कॅथरीन यांचा जन्म फ्रान्समध्ये एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांनी पुढे येमेन देशात एका मुस्लीम व्यक्तीशी लग्न केले. त्यानंतर इस्लाम धर्म आणि मध्य-पूर्वेतील देशांबाबत त्यांचे आकर्षण वाढले. शकदम या येमेनविषयी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सल्लागारही राहिलेल्या आहेत. इराण, दहशतवाद, इसाल्मी कट्टरवाद या विषयांत त्यांना सखोल ज्ञान आहे.

दरम्यान, आता शकदम यांच्यावर एका खासदारानेच गंभीर स्वरुपाचे आरोप केल्यानंतर आता नेमके काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.