आरबीआय नवीन सोन्याचे कर्ज नियमः ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, आता शेती आणि लघु व मध्यम उद्योगांतील (MSME) कर्जासाठी 2 लाख रुपयांपर्यंत सोने (Gold) अथवा चांदी (Silver) गहाण ठेवता येणार आहे. शेतकरी आणि लघु उद्योजकांसाठी कर्ज मिळवण्याचा मार्ग त्यामुळे अधिक सुलभ झाला आहे. याआधी विशिष्ट मर्यादेपर्यंत तारणाशिवाय कर्ज दिले जात होते. मात्र, आता कोणी व्यक्ती स्वेच्छेने सोने किंवा चांदी तारण ठेवण्याची इच्छा दर्शविली, तर बँकेने त्यास नकार देता कामा नये, असा आदेश रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील शेतकरी आणि लहान उद्योजकांना होणार असून, त्यांना कर्जासाठी विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून जाहीर केले की, जर एखादा शेतकरी किंवा व्यावसायिक स्वेच्छेने गहाण ठेवू इच्छित असेल, तर बँका 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सोने किंवा चांदी स्वीकारू शकतील. एका बँक अधिकाऱ्याने सांगितले की, “या नव्या नियमामुळे, जर कोणीतरी आपले सोने किंवा चांदी गहाण ठेवले, तर त्याला तारणाशिवाय कर्ज घेण्याच्या पूर्वीच्या सुविधेपासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खात्री होईल.”
या निर्णयामुळे शेतकरी आणि छोटे व्यावसायिकांना शेतीसाठी किंवा छोट्या उद्योगांसाठी कर्ज घेणे अधिक सोपे होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होईल, कारण सोने ही त्या भागातील सहज उपलब्ध होणारी संपत्ती आहे.
आता नागरिक सोने किंवा चांदी गहाण ठेवून शेती किंवा लघुउद्योगासाठी सहजपणे कर्ज घेऊ शकतील. त्यामुळे बँकांसाठीही कर्ज वाटप करणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामात किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आर्थिक मदत मिळणे शक्य होईल. सोने गहाण ठेवून कर्ज देण्याची प्रक्रिया तुलनेने जलद आणि सोपी असते.
2023 मध्ये रिझर्व्ह बँकेने बँकांना निर्देश दिला होता की, दागिन्यांवर दिलेली सर्व कर्जे ‘गोल्ड लोन’ म्हणून विचारात घ्यावीत. या निर्णयामुळे बँकांना सुवर्ण कर्जासंबंधित नियमांचे पालन करणे बंधनकारक झाले. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न हंगामावर आधारित असल्यामुळे त्यांना कर्जावर काही विशेष सवलती उपलब्ध असतात. सुवर्ण कर्जाच्या बाबतीत मात्र अशा सवलती लागू होत नाहीत. याच कारणामुळे 2023 मध्ये सरकारी बँकांचा सुवर्ण कर्ज व्यवसाय जवळजवळ दुप्पट वाढला. आता या नव्या नियमामुळे बँकांनाही फायदेशीर स्थिती प्राप्त होणार आहे. गोल्ड लोन हे तुलनेने कमी जोखमीचे असल्यामुळे बँका गावखेड्यांतील अधिक लोकांना सहज कर्ज देऊ शकतील. त्यामुळे सरकारने ठरवलेली कर्जवाटपाची उद्दिष्टे पूर्ण करण्यातही बँकांना मदत होणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा