रवींद्र जडेजाने लॉर्ड्स कसोटी सामन्यात मोठे शॉट्स का खेळले नाहीत? समोर आलं कारण
GH News July 16, 2025 06:11 PM

शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवण्यात चुकली. अवघ्या 22 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. रवींद्र जडेजाने शेवटपर्यंत झुंज दिली पण दुसऱीकडून साथ न मिळाल्याने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. जडेजाने शेवटपर्यंत फलंदाजी करत सामना विजयाच्या वेशीपर्यंत आणला होता. पण मोहम्मद सिराज बाद झाला आणि भारताला 22 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात रवींद्र जडेजाच्या खेळीवर काही माजी खेळाडूंनी आक्षेप घेतला. अनिल कुंबळे, सुनील गावस्कर आणि सौरव गांगुली यांनी रवींद्र जडेजाने शेवटी जोखिम पत्कारायला हवी होती. कदाचित त्याच्या फटकेबाजीमुळे टीम इंडिया लॉर्ड्सवर सामना जिंकू शकली असती, असं त्यांनी मत मांडलं. पण आता दिग्गज चेतेश्वर पुजाराने याबाबत विश्लेषण केलं आहे. रवींद्र जडेजाला लॉर्ड्सवर मोठे शॉट्स खेळणं का कठीण होतं ते सांगितलं.

लॉर्ड्स मैदानावर मोठे शॉट्स खेळणं का कठीण होतं? याबाबत चेतेश्वर पुजाराने आपलं म्हणणं इंडियन एक्स्प्रेससमोर मांडलं. पुजाराने सांगितलं की, रवींद्र जडेजा त्या विकेटवर वेगाने खेळू शकत नव्हता. मला वाटतं की चेंडू सॉफ्ट झाला होता आणि खेळपट्टीही संथ होती. जडेजाने कदाचित असा विचार केला असेल की शेपटचा फलंदाज खेळत आहेत. ते चांगली फलंदाजी करत होतो. टीम इंडिया विजयाच्या जवळ जात होती. जर टीम विजयाच्या जवळ गेली असती तर तो वेगाने खेळू शकला असता. माझ्या मते जडेजाने चांगली बॅटिंग केली. त्या खेळपट्टीवर धावा करणं कठीण होतं.

चेतेश्वर पुजाराने पुढे सांगितलं की, जडेजा त्या खेळपट्टीवर समोर खेळू शकला असता. मिड ऑफ आणि कव्हर्समध्ये खूप अंतर होतं. पण इंग्लंडच्या गोलंदाजानी तिथे टप्पेच टाकले नाहीत. चेंडू जेव्हा सॉफ्ट होतो तेव्हा समोर खेळणं सोपं नसतं. एक गोष्ट मान्य करावी लागेल की, जडेजाची फलंदाजी पूर्वीच्या तुलनेत खूपच सुधारली आहे. पूर्वी जडेजा फक्त फिरकीला चांगला खेळायचा. पण आता वेगवान गोलंदाजांविरूद्धही तितकाच गंभीरपणे खेळतो. रवींद्र जडेजाने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यातील सहा डावात 109 च्या सरासरीने 327 धावा केल्या आहेत. कसोटी मालिकेत त्याने सलग चार अर्धशतकं झळकावली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.