गेल्या काही महिन्यांपासून अनेक देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. इराण आणि इस्रायल दरम्यान युद्धबंदीची घोषणा झाली असली तरीही युद्धाचे सावट अजूनही कायम आहे. सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा इराणवर मोठा हल्ला होण्याचे संकेत मिळाले आहेत. कारण अनेक देशांनी आपल्या नागरिकांना ऑगस्टपर्यंत इराण सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तीन महत्त्वाच्या गोष्टींमुळे इराणवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने करार करण्यासाठी इराणला ऑगस्टची डेडलाइन दिली आहे, तोपर्यंत करार न झाल्यास इराणची चिंता वाढू शकते. त्याचबरोबर भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना इराण सोडण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आगामी काळात इराण राहणे धोकादायक असेल. पुढील कारणांमुळे इराणवर हल्ला होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेची डेडलाइन
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या संभाषणानंतर करार करण्यासाठी इराणला ऑगस्टच्या अखेरपर्यंत वेळ दिला आहे. इराण अमेरिकेच्या अटींपुढे झुकला नाही तर इराणच्या अणुप्रकल्पांसह लष्करी तळांवर हल्ला होण्याची शक्यता आहे.
इराण चर्चेसाठी तयार पण अमेरिकेला निवांत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की, ‘इराण चर्चेसाठी तयार आहे, मात्र अमेरिकेला घाई नाही.’ याचा अर्थ असा की अमेरिका फक्त कराराचे लालच देत आहे, मात्र त्यांना करार करायचा नाही. ऑगस्टपर्यंत करार न झाल्यास अमेरिका इराणवर भीषण हल्ला करण्याची शक्यता आहे.
भारतीय दूतावासाचा इराण सोडण्याचा सल्ला
इराणमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या महिन्यात इस्रायल आणि इराणमधील युद्धादरम्यान, भारताने दोन्ही देशांमधून आपल्या नागरिकांना बाहेर खास ऑपरेशननही राबवले होते. आताही भारतीय दुतावासासह इतर देशांनीही आपल्या नागरिकांना मायदेशी परतण्यास सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात भीषण युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इस्रायलने दिला इशारा
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी 11 जुलै रोजी इराणकडे 60 दिवस आहेत, त्यानंतर आम्ही इस्रायली पद्धतीने कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला इस्रायलने इराणवर कारवाई केल्यास युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.