राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. युती आणि आघाड्यांचे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वेळी मुंबई माहपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक भाजपा, ठाकरे गट, शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई जिंकण्यासाठी मोठी खेळी केली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातून आंदराज आंबेडकर यांच्याशी युती केली आहे.
आगामी महापालिकेची निवडणूक लक्षात घेता एकनाथ शिंदे आणि आनंजराज आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. आता या निवडणुकीत शिंदेचा शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना हे दोन्ही पक्ष एकाच मंचावर दिसतील. दोन्ही नेत्यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली आहे. युतीची घोषणा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच जागावाटपाचा फॉर्म्यूला काय असेल यावरही भाष्य केलं.
भूतकाळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली होती. नंतर मात्र ही युती टिकली नाही. भविष्यात तुमचीही युती कायम राहील हे कशावरून? असा सवाल एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. यावर शिंदे यांनी भविष्यातही आमची युती कायम राहील, असा विश्वास केला. तसेच, आम्हाला एकमेकांवर विश्वास आहे. कार्यकर्त्यांचे विचार जुळत आहेत. आम्ही दोघेही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमच्या महायुतीत कुठेही अडचण येणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
तसेच ती महाविकास आघाडी होती. ही महायुती आहे. महाविकास आघाडी स्वार्थासाठी आली होती, असा टोला लगावत आम्ही लोकांच्या कल्याणासाठी एकत्र आलो आहोत, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी व्यक्त केले. पुढे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांच्यात युती झालेली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन सेनेला कोणाच्या कोट्यातून जागा मिळणार? असा सवाल शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी जागावाटपावर थेट बोलणं टाळलं.
एवढ्या लवकर जागावाटपाची चिंता करण्याची गरज नाही. अजून महापालिकेच्या निवडणुकीला वेळ आहे. आम्ही मनाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे जागावाटपाचा विषय आमच्यासाठी गौण आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. शिंदे यांच्या उत्तरामुळे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत जागावाटपावर नेमकं काय ठरलं? हे थेटपणे स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, आता रिपब्लिकन सेना आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने एका प्रकारे शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत याचा चमत्कार दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.