ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. भारताने पहिला सामना हा 4 विकेट्सने आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडने भारतासमोर 259 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 10 बॉलआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. भारताने 48.2 ओव्हरमध्ये 262 धावा केल्या. दीप्ती शर्मा हीने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर इतर सर्वांनी दुहेरी आकडा गाठत चांगली साथ दिली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
दीप्ती शर्मा आणि अमनज्योत कौर या जोडीने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. अमनज्योतने निर्णायक क्षणी दीप्तीला अप्रतिम साथ दिली. दीप्तीने 64 चेंडूत 1 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 62 रन्स केल्या. तर अमनज्योत हीने 14 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 20 धावा केल्या.
त्याआधी पाचही फलंदाजांनी दुहेरी आकड्यात धावा करत विजयात योगदान दिलं. दीप्ती व्यतिरिक्त जेमीमाह रॉड्रिग्स हीने सर्वाधिक धावा केल्या. जेमीमाहचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. जेमीमाहने 48 रन्स केल्या. ओपनर प्रतिका रावल हीने 36 धावा केल्या. स्मृती मंधाना हीने 28 धावांचं योगदान दिलं. हर्लीन देओलने 27 धावा जोडल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर हीला अपेक्षेनुसार मोठी खेळी करता आली नाही. हरमनप्रीतने 17 धावा केल्या. तर रिचा घोष हीने 10 धावा करुन मैदाना बाहेरचा रस्ता धरला.
इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंड 300 पार करण्यात अपयशी ठरली. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 260 धावांच्या आतच रोखलं. इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 258 धावा केल्या.
भारताची विजयी सलामी
इंग्लंडसाठी सोफीया डंकले हीने सर्वाधिक 83 धावा केल्या. डेव्हीडसन रिचर्डने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन नॅट सायव्हर ब्रँटने 41 धावा केल्या. एमा लांबने 39 धावा जोडल्या.तर सोफी एकलस्टोन हीने नाबाद 23 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 250 पार पोहचता आलं. तर टीम इंडियाकडून क्रांती गौड आणि स्नेह राणा या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अमनज्योत कौर आणि श्री चरणी या दोघींच्या खात्यात 1-1 विकेट गेली.