Indian Nurse Nimisha Priya : हत्येनंतर खोट बोलल्याने वाढल्या निमिषा प्रियाच्या अडचणी ? तलाल महदीच्या भावाने काय सांगितलं ?
GH News July 17, 2025 12:08 PM

मूळची केरळ येथील असलेली आणि काही वर्षांपासून येमेनमध्ये राहणारी भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी सध्या तरी थांबवण्यात आली आहे, मात्र एका विधानामुळे तिच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. खरं तर, मृत तलाल अब्दो महदीच्या कुटुंबाने तडजोड आणि माफीचे सर्व प्रयत्न पूर्णपणे नाकारले आहेत. दरम्यान, तलाल महदीचा भाऊ अब्देलफत्ताह महदीने एक भावनिक आणि जोरदार विधान केलं आहे. त्याच्या कुटुंबाला फक्त किसास म्हणजेच सूडाची कारवाई मंजूर आहे, असं त्याने स्पष्ट केलं आहे.

खून माफ करता येणार नाही

निमिषाच प्रियाच्या फाशीला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर, तलाल महदीचा भाऊ अब्देलफत्ताहने फेसबुक पोस्ट लिहीली आहे. आता फाशी पुढे ढकलण्यात आली आहे, हे आमच्यासाठी दुःखद आहे कारण आम्ही आधीच सर्व प्रकारच्या तडजोडी आणि दियाचे प्रस्ताव नाकारले होते. जे लोक ही फाशी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माहित आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नाही, असंही त्याने नमूद केलंय.

कुटुंबियांकडून अनेक आरोप

अब्देलफताह महदी यांनी असा आरोप लावला आहे की तलालच्या हत्येनंतर, केवळ सत्य दाबण्यात आले नाही तर त्यांच्या कुटुंबाचे दुःख आणखी वाढवण्यासाठी खोट्या कथाही रचण्यात आल्या. त्या वेदनादायक गुन्ह्याने आम्ही फक्त तुटलो नाही तर त्यानंतरचा दीर्घ आणि कंटाळवाणा खटला आमच्यासाठी यातनापेक्षा कमी नव्हता, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. हा ( हत्या) एक घृणास्पद आणि उघड गुन्हा होता. खरं तर, निमिषावर तलालला भूल देण्याचा अतिरेक देऊन आणि नंतर शरीराचे तुकडे करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.

मात्र तलाल महदीने तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले, तिचे पैसे हिसकावले, तिचा पासपोर्ट जप्त केला आणि तिला बंदुकीची धमकी दिली असा दावा तिने न्यायालयात केला. पण अब्देलफताहने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत आणि आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितलं. माझ्या भावाने निमिषाला कधीच धमकी दिली नाही किंवा तिचा पासपोर्ट जप्त केला नाही. ही सर्व कथा त्या हत्येचे, गुन्ह्याचे समर्थन करण्यासाठी रचण्यात आली होती असा दावा त्याने केला. निमिषाकडून शोषणाची जी काही कहाणी बाहेर आली आहे ती खोटी आणि अफवा असल्याचेही त्याने म्हटले.

काय आहे प्रकरण ?

भारतीय नर्स असलेली निमिषा प्रियाला येमेनी न्यायालयाने 2020 साली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. 2017 मध्ये तिने तिचा येमेनी व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदीची हत्या केली. महदी हाँ निमिषाला छळत असे आणि तिला भारतात परतण्यापासून रोखत होता असा दावा केला जात आहे. याच दरम्यान महदीची हत्या करण्यात आली, ज्याचा मृतदेह नंतर तुकड्यात सापडला. निमिषाला काल म्हणजे 16 जुलै 2025 रोजी फाशी होणार होती, परंतु 15 जुलै रोजी येमेन प्रशासनाने ती पुढे ढकलली. भारतातील आघाडीचे सुन्नी धार्मिक नेते कंठापुरम ए. पी. अबुबकर मुसलियार यांनीही याची पुष्टी केली. त्यांनी येमेनमधील प्रभावशाली विद्वानांशी चर्चा करत या प्रकरणात निमिषाच्या बाजूने हस्तक्षेप केला. यानंतर येमेनच्या सरकारने फाशी थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.