RCB Stampede Case Update: यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चा संघ विजयी झाला होता. या संघाचा विजयाच्या उत्सवादरम्यान बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. त्याबाबत कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला आहे. सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या या अहवालात अनेक गंभीर त्रुटींचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणात विराट कोहली याचे नाव समोर आले आहे. अहवालात म्हटले आहे की, विराट कोहली याने व्हिडिओमध्ये चाहत्यांना व्हिक्ट्री परेडमध्ये मोफत येण्याचे आवाहन केले होते.
४ जून रोजी बंगळुरुमधील चेन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली होती. या प्रकरणात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने आरसीबीला जबाबदार धरले होते. आरसीबीने पोलिसांची परवानगी न घेता व्हिक्ट्री परेडची घोषणा केली होती. त्यात लाखो लोकांची गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान ११ जणांचा मृत्यू झाला होता.
बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला आहे. त्यात निष्काळजीपणा आणि गैरव्यवस्थापन समोर आले आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दंडाधिकारी आणि न्यायालयीन चौकशी सुरू झाली. एफआयआर दाखल करण्यात आला. काही पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवांना निलंबित करण्यात आले होते. गुप्तचर प्रमुखांची बदली करण्यात आली आणि जखमींना भरपाई जाहीर करण्यात आली.