ENG vs IND : तर ऋषभ पंत याला चौथ्या कसोटीत.., रवी शास्त्री स्पष्टच म्हणाले
GH News July 18, 2025 11:09 PM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात करण्यात आलं आहे. याआधी उभयसंघात लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात आला. इंग्लंडने हा सामना अवघ्या 22 धावांनी जिंकला. लॉर्ड्समध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापत झाली. पंतला विकेटकीपिंग दरम्यान ही दुखापत झाली.त्यामुळे पंतला असह्य वेदना झाल्या. पंतला त्यामुळे दुखापतीनंतर दोन्ही डावात कीपिंग करता आली नाही. मात्र पंतने बॅटिंग केली. पंतच्या या दुखापतीवरुन भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रवी शास्त्री यांनी पंतच्या दुखापतीवरुन रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पंत पूर्णपणे फिट नसेल तर मँचेस्टर कसोटीतून बाहेर करा, असं शास्त्री म्हणाले आहेत. शास्त्री यांनी चौथ्या कसोटीआधी आयसीसी रीव्हीव्यूमध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन हीच्यासोबत बोलताना पंतच्या दुखापतीवर भाष्य केलं.

रवी शास्त्री काय म्हणाले?

“ऋषभ पंतचं बोट तुटलं तर नाही ना, हे पाहावं लागेल. पंतचं बोट फ्रॅक्चर तर झालं नाही ना? आता तर इंग्लंडलाही माहित झालंय की भारतीय फलंदाजाला दुखापत आहे. चौथ्या कसोटीसाठी जेव्हा संघ निवडला जाईल तेव्हा त्याला (ऋषभ पंत) विकेटकीपिंग आणि बॅटिंग करावी लागेल. पंत दोघांपैकी काही एकच करु शकतो. पंतसाठी दोन्ही भूमिका बजावणं महत्त्वाचं आहे. जर पंत पूर्णपणे फिट असेल तर तो खेळू शकतो”, असं शास्त्री यांनी नमूद केलं.

“मला नाही वाटत की पंत चौथ्या सामन्यात फक्त फलंदाज म्हणून खेळेल. कारण पंतने विकेटीकीपिंग न केल्यास त्याला फिल्डिंग करावी लागू शकते. पंतने फिल्डिंग केल्यास दुखापत आणखी वाढू शकते. ग्लोव्हजमुळे त्याचे हात काही प्रमाणात सुरक्षित राहतील. मात्र फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली तर स्थिती भीषण होईल”, अशी भीतीही शास्त्रींनी व्यक्त केली.

ऋषभ पंतची कमाल बॅटिंग

ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली. पंतने 3 सामन्यांमधील 6 डावांत 70.83 च्या सरासरीने आणि 78.41 या स्ट्राईक रेटने एकूण 425 धावा केल्या आहेत. पंतने या दरम्यान 2 शतकं आणि 2 अर्धशतकांसह एकूण 425 धावा केल्या.

इंग्लंडला रोखण्याचं आव्हान

दरम्यान भारतासमोर आता चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासमोर चौथा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान आहे. यात शुबमनसेना किती यशस्वी ठरते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.