राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले आहेत. विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच आज सकाळी माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सरकार भिकारी…
राज्य सरकारने एक रुपयात पिकविमा ही योजना आणली होती. यावर बोलताना मंत्री कोकाटे म्हणाले की, ‘हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला. शेतकऱ्यांना आम्ही एक रुपया देत नाही. आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतो. म्हणजे भिकारी कोण शासन आहे.’ कोकाटेंच्या या विधानामुळे वादाला सुरुवात झाली आहे.
मी 52 जीआर काढले – कोकाटे
पुढे बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, ‘माझ्या काळात पिकविमा योजनेत बोगस अर्ज सापडले. मी तात्काळ रद्द केले. मी 52 जीआर काढले. सर्वाधिक निर्णय घेतले. आतापर्यंत एकही कृषी मंत्री संशोधन केंद्रावर गेला नाही. मी गेलो. मी बांधावर गेलो. प्रत्येक गावात वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही माझी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. 100 दिवसाच्या कार्यक्रमात तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आहे.’
राजीनामा देण्यासारखं काय घडलं?
विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बोलताना कोकाटे यांनी, ‘राजीनामा देण्यासारखं घडलं काय. मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय. ज्या विरोधकाने जो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. प्रतिक्रिया सुरू होतात. दारू प्याला असेल, गांजा प्यायला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात’ असं विधान केलं आहे.
मला विधानसभेचे नियम माहीत आहेत
पुढे बोलताना कोकाटे म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांना मी ब्रिफ केलं नाही. त्यांना मी भेटलो नाही. त्यांनी मीडिया रिपोर्टवर प्रतिक्रिया दिली आहे. मी 25 वर्ष विधानसभेत आहे. मला विधानसभेचे नियम माहीत आहेत. पण काही लोकांनी अनावश्यक विषय लावून धरला. अँड्राईड मोबाईल आहे. काही टच झालं तर भलतंच काही तरी दिसतं. स्किप करेपर्यंत माझा दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला असेल.’