राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहिला आहे. यांत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत.
देवेंद्र आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2014 ते 2019 दरम्यान आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कारकीर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने या आव्हानांचा सामना केला आहे. फडणवीस यांच्या 2014 -2019 च्या कार्यकाळात महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली.‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सारख्या योजना त्यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या, ज्यामुळे त्यांच्या पक्षात त्यांची विश्वासार्हता वाढली.
फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल. देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू, आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांचे आर्थिक आणि सामाजिक धोरणांचे यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांत यश मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा !