आशिया कप 2025 स्पर्धेची क्रीडाप्रेमी मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. सप्टेंबर महिन्यात टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार असून युएईत होणार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान हे दोन पारंपरिक संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आता या स्पर्धेतून आणखी एक बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ एकदा नाही तर तीनदा भिडणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघांचा समना होणार आहे, यात काही शंका नाही. दोन्ही संघांचं वर्चस्व पाहत हे संघ सुपर सिक्स फेरीतही जागा मिळवतील. त्यामुळे या गटात दोन्ही संघ पुन्हा भिडण्याची शक्यता आहे. जर या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली तर अंतिम फेरीतही आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं की, ‘बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला एसीसी मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सर्वांशी सकारात्मक चर्चा केली आहे. आता याबाबत काही दिवसात अधिकृतपणे जाहीर केलं जाईल.’ 2008 दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान द्विपक्षीय मालिका बंद आहेत. दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि एसीसी स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतात. आशिया कपची सुरुवात 1984 पासून झाली आहे. आतापर्यंत 16 पर्व पार पडले आहेत. यात भारताने सर्वाधिक 8वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यानंतर श्रीलंकेने सहा वेळा, तर पाकिस्तानने दोन वेळा जेतेपद मिळवलं आहे.
भारत आणि पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत शेवटचे भिडले होते. हायब्रिड मॉडेलवर झालेल्या या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना दुबईत पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. यात पाकिस्तानला 241 धावांवर सर्वबाद केलं. तसेच हे आव्हान भारताने 43 व्या षटकात पूर्ण केलं. दरम्यान, टीम इंडिया 2008 मध्ये शेवटचं पाकिस्तानला गेली होती. तेव्हा तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पाकिस्तानला 1-0 ने पराभूत केलं होतं. दोन सामने ड्रॉ झाले होते.