इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने टीम इंडिया विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसर्या दिवशी इतिहास घडवला आहे. रुटने मँचेस्टरमध्ये एकाच झटक्यात भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस या दोघांना मागे टाकलं आहे. जो रुटने द्रविड आणि कॅलिसला कसोटीत सर्वाधिक धावा करण्याबाबत मागे टाकलं आहे. रुट यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक कसोटी धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. तर रिकी पॉन्टिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या स्थानी पोहचलेल्या जो रुट याला याच सामन्यात रिकी पॉन्टिंग याला मागे टाकण्याची संधी आहे.
जो रुट याला या सामन्याआधी द्रविडला मागे टाकण्यासाठी 30 धावांची गरज होती. तर जॅक कॅलिसला पछाडण्यासाठी 31 धावा हव्या होत्या. रुटने मँचेस्टरमध्ये 31 धावा करताच द्रविड आणि जॅक कॅलिस या दोघांना मागे टाकलं. रुट यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. इंग्लंडने तिसर्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत 74 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 332 धावा केल्या. रुटने तोपर्यंत 115 बॉलमध्ये नॉट आऊट 63 रन्स केल्या. त्यामुळे आता रुटकडे आणखी धावा जोडून पॉन्टिंगचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
जो रुट याचा कसोटी कारकीर्दीतील हा 157 वा सामना आहे. रुटने 286 डावात 50 च्या सरासरीने 13 हजार 290 धावा केल्या आहेत. रुटने या दरम्यान 37 शतकं झळकावली आहेत.
दरम्यान इंग्लंड टीम इंडिया विरूद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर इंग्लंडकडे चौथा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी आहे. तर भारतासाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे भारतीय संघ इथून कमबॅक करत इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.