भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला त्यांच्याच घरात टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत लोळवलं. भारतीय महिला संघाने दोन्ही मालिका जिंकत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर आता भारतीय महिला संघातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाची अनुभवी महिला खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हीने क्रिकेटला अलविदा केला आहे. वेदाने टीम इंडियासाठी 2020 साली अखेरचा सामना खेळला होता. वेदा गेली 5 वर्ष भारतीय संघातून बाहेर होती. त्यानंतर आता वेदाने क्रिकेटला अलविदा केला आहे.
वेदाने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. वेदाने या पोस्टमधून सर्वांचे आभार मानले. “माझा प्रवास कडूरमधून सुरु झाला. मी बॅट उचलली. मी या प्रवासात कुठवर पोहचेन हे मला माहित नव्हतं, मात्र मला इतकं माहित होतं की मला हा खेळ फार आवडतो. क्रिकेट मला एका छोट्या चाळीतून जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपर्यंत नेईल असा कधीच विचार केला नव्हता”, असं वेदाने तिच्या क्रिकेटमधील प्रवासाबाबत म्हटलं.
“भारताची जर्सी परिधान करणं माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. क्रिकेटने मला फक्त करियर नाही, तर ओळखही दिली. क्रिकेटने मला लढायाचं कसं हे शिकवलं. तसेच पडल्यानंतर पुन्हा कसं उठायचं हे देखील क्रिकेटने शिकवलं”, असंही वेदाने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.
वेदाने या सोशल मीडिया पोस्टमधून बीसीसीआय, कुटुंबियांचे जाहीर आभार व्यक्त केले. “मी अंतकरणाने या अध्यायाचा शेवट करत आहे. माझ्या आई-वडिलांची आणि विशेष करुन बहिणीची आभारी आहे. आम्ही 2017 साली खेळलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे महिला क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. मला याचा नेहमीच अभिमान राहील”, असं वेदाने म्हटलं.
वेदा कृष्णमूर्तीचा क्रिकेटला अलविदा
वेदाने 2011 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. वेदाने तेव्हापासून 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26.39 च्या सरासरीने 818 धावा केल्या. वेदाने या दरम्यान 8 अर्धशतकं झळकावली. तसेच वेदाने 76 टी 20i सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 875 धावा केल्या. तसेच वेदाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 47 सामन्यांमधील 6 डावांत 3 विकेट्स घेतल्या. मात्र वेदाला टी 20i क्रिकेटमध्ये एकही विकेट घेता आली नाही.