Education News : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! बी.फार्मसी आणि कृषी प्रवेशाला मुदतवाढ
esakal July 26, 2025 07:45 AM

नाशिक- औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम (बी.फार्मसी)च्या प्रथम वर्षास प्रवेशाच्या नोंदणीला मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार सोमवार (ता. २८)पर्यंत पात्रताधारक विद्यार्थी नोंदणी करू शकतील. प्रवेशफेरीची (कॅप राउंड) प्रक्रिया ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ७ जुलैपासून प्रवेश नोंदणीला सुरुवात केली होती. यानंतर मुदतवाढ देताना आता सध्या प्रवेशफेरीत सहभागासाठी आवश्यक नोंदणी करण्यासाठी २८ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. निर्धारित कालावधीत पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करून त्यांची कागदपत्रे तपासून घ्यायची आहेत.

त्यासाठी ई-स्क्रूटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटिनीच्या माध्यमातून २९ जुलैपर्यंत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. १ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. यादीसंदर्भात हरकती नोंदविण्यासाठी २ ते ४ ऑगस्टदरम्यान मुदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंतिम गुणवत्तायादी ७ ऑगस्टला जाहीर होईल. या यादीच्या आधारे प्रवेशफेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

Education News : पवित्र पोर्टलचा दिलासा; शिक्षक भरती अंतिम टप्प्यात, शाळांना मिळणार नवे शिक्षक

‘कृषी’च्या प्रवेशासाठी रविवारपर्यंत मुदतवाढ कृषी शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी १७ जुलैपर्यंत मुदत असताना आता पात्रताधारक विद्यार्थ्यांना रविवार (ता. २७)पर्यंत नोंदणी करून प्रवेशाच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ३१ जुलैला अंतरिम गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाईल. हरकती नोंदविण्यासाठी १ ते ३ ऑगस्टचा कालावधी असेल. ५ ला अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध करून पहिल्या फेरीची यादी ९ ऑगस्टला प्रसिद्ध होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.