नागपूर : राज्यातील बारा गैरकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या २ हजार ५३४ पदांपैकी तब्बल १ हजार ३६८ म्हणजेच ४७ टक्के पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंडळाने ६६९ पदे भरण्यासाठी २०१९ मध्ये मान्यता असतानाही यातील एकही पद भरण्यात आले नाही. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अर्ज केल्यानंतर ही धक्कादायक स्थिती समोर आली.
राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येतात. मात्र, गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणाच्या गप्पा मारत असताना बहुतांश विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त असल्याने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण हे दिवास्वप्न ठरले आहे.
यामुळे विद्यापीठांचा दर्जाही खालावत असल्याचे दिसून येते. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर यांच्यासह इतर विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. सर्वाधिक २११ पदे मुंबई विद्यापीठात, तर १९१ पदे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिक्त असून त्यापाठोपाठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील १६० रिक्त पदे रिक्त आहे.
मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठात १२९, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात १२४ तर छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रिक्त पदांची संख्या १२८ एवढी आहे. उल्लेखनीय म्हणजे, ७ ऑगस्ट २०१९ रोजी एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पद भरण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली होती. मात्र, एकही पद भरण्यास विद्यापीठांना यश आलेले नाही.
विद्यापीठाची जाहिरात रद्दराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दीड वर्षांपूर्वी ९२ पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. मात्र, त्या जाहिरातीमध्ये विद्यापीठाने ‘एलआयटीयू’ विद्यापीठातील विभागांच्या पदांचा समावेश केला होता. त्यामुळे काही दिवसांतच ही जाहिरात रद्द करण्यात आली.
Nagpur Market Corruption: एपीएमसी गैरव्यवहाराची एसआयटीकडून चौकशी सुरू; महिनाभरात शासनाकडे सादर करणार अहवालरिक्त पदांची स्थिती
विद्यापीठ मंजूर पदे रिक्त पदे मान्यता पदे
मुंबई विद्यापीठ ३७८ २११ १३६
एसएनडीटी २५८ १२९ ७८
कवी कुलगुरू कालिदास
संस्कृत विद्यापीठ ४३ २१ १२
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
नागपूर विद्यापीठ ३३९ १६० ९२
गोंडवाना विद्यापीठ ४३ २० ११
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
सोलापूर विद्यापीठ ४६ १६ ०७
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर २६२ १२४ ७२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ४०० १९१ १११
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ २७२ १२८ ७३
कवयित्री बहिणाबाई चौधरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ १११ २८ ०६
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ १६७ ५४ २१
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ १२१ ३७ १३