Nagpur Market Corruption: एपीएमसी गैरव्यवहाराची एसआयटीकडून चौकशी सुरू; महिनाभरात शासनाकडे सादर करणार अहवाल
esakal July 26, 2025 07:45 AM

नागपूर : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहाराची सर्वंकष चौकशी करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) गठित केली आहे. या पथकामार्फत चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे पथक महिन्याभरात या प्रकरणाची चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर करणार आहे.

या पथकाचे सदस्य सचिव तथा विभागीय सहनिबंधक शरद जरे, सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर हे आहेत. १८ जुलैच्या शासन निर्णयान्वये या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर येथील संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहार/भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या अनुषंगाने बाजार घटकांना अथवा बाजार समितीशी संबंधित व्यक्तींना विशेष तपासणी पथकास समितीला माहिती सादर करता येईल.

सुमारे चाळीस कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके आणि आमदार आशिष देशमुख यांनी केला होता.

कोट्यवधीचा महसूल बुडवणारे सहनिबंधक व कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरचे तत्कालीन सचिव यांना कोण अभय देत आहे, त्यांची पाठराखण का केली जात आहे? असा सवालही या तिन्ही आमदारांनी उपस्थित केला होता. त्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा करत तसा शासन निर्णयही पणन विभागाने १८ जुलै २०२५ रोजी जारी केला आहे.

Nagpur News: सोशल मीडियावरही भरतो ‘अंधश्रद्धेचा दरबार’; पैशांसाठी भोंदूंचा नवा फंडा, अघोरी प्रकारांमधून नागरिकांच्या भावनांशी खेळ पथकाकडे देता येणार माहिती

संबंधितांनी आपले म्हणणे नागपूर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक (नागपूर ग्रामीण यांच्या कार्यालयात सादर करावे, अथवा संपर्क साधावा. तसेच विशेष तपासणी पथक यांचे कार्यालय, भूविकास बँक कॉम्प्लेक्स, दुसरा माळा, गणेशपेठ पोलिस स्टेशनसमोर, नागपूर व Email: apmcsit25@gmail.com या पत्यावर माहिती पाठवावी, असे आवाहन शरद जरे यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.