खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल
esakal July 26, 2025 09:45 AM

काटेवाडी, ता. २४ : पुणे जिल्ह्यात खरीप पेरण्यांमध्ये बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुके अव्वल ठरले आहेत. बारामती उपविभागात आतापर्यंत ११४.९ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याने १०० टक्क्यांहून अधिक पेरणी केलेली नाही, परंतु बारामती उपविभागाने ही कामगिरी केली आहे. मात्र, बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील जिरायती भागात पावसाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

जुलै २०२५ मध्ये इंदापूर तालुक्यात केवळ १८ मिलिमीटर पाऊस झाला तर बारामतीत १९.३ मिलिमीटर आणि पुरंदरमध्ये २८.८ मिलिमीटर (२२.६ टक्के) पावसाची नोंद आहे. कमी पावसामुळे बाजरी, मका, भुईमूग आणि कडधान्यांसारख्या खरीप पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी करूनही पावसाअभावी पिके सुकण्याचा धोका आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. विशेषत: जिरायती भागातील शेतकरी अडचणीत आले असून, पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मे २०२५ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला होता, परंतु आता पावसाच्या कमतरतेमुळे त्यांच्यासमोर नवे संकट उभे आहे.


प्रमुख पिकांचा आढावा...
बारामती: बाजरी (५,६५० हेक्टर) आणि मका (४,४०१ हेक्टर) यांनी तालुक्यातील खरीप क्षेत्राचा निम्म्याहून अधिक हिस्सा व्यापला आहे. जिल्यात सूर्यफुलाची सर्वाधिक पेरणी (२०३ हेक्टर) याच तालुक्यात झाली आहे. तसेच, कडधान्याखाली ८७० हेक्टर क्षेत्र
इंदापूर: मक्याची सर्वाधिक पेरणी (१७,०४० हेक्टर) झाली असून, कडधान्याखाली ४०० हेक्टर क्षेत्र
पुरंदर: बाजरीची सर्वाधिक पेरणी (१०,४४८ हेक्टर) झाली आहे, तर भुईमूग २,४६५ हेक्टर आणि कडधान्य २,३५७ हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले आहे.
दौंड: कडधान्याखाली ५४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी केले आहे.

दृष्टिक्षेपात
१. बारामती उपविभागातील शेतकऱ्यांनी पावसाच्या कमतरतेतही पेरणीची सरासरी ओलांडली.
२. इंदापूर आणि दौंड तालुक्यांमध्ये अनुक्रमे १३१ टक्के आणि १२१ टक्के पेरणी.
३. जिरायत भागात पावसाची कमतरता पिकांच्या वाढीवर परिणाम


तालुकानिहाय पेरणी तपशील (हेक्टरमध्ये)
तालुका.....सरासरी......पेरणी...... टक्केवारी
बारामती....११,७९६.....१२,६३३.......१०७
इंदापूर.....१४,००६.....१८,३७२......१३१
दौंड.......६१३१..........७३९७......१२१
पुरंदर......१८,५३१......१६,९४४........९१

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.