विश्रांतवाडी - येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील लिफ्ट गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे बंद असून नागरिक आणि कर्मचाऱ्यांची दररोज तारांबळ उडत आहे. गुरुवारी दुपारी वडगावशेरीचे आमदार कार्यालयात बैठक घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने घाईघाईत लिफ्ट दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ बोलावले. मात्र, लिफ्टची दुरुस्ती सुरू असतानाच दोन कर्मचारी लिफ्टमध्ये अडकले. तब्बल १० ते १५ मिनिटानी त्यांची सुटका करण्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली.
तीन मजली असलेल्या या इमारतीत दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी ये-जा करतात. या इमारतीत तळजल्यावर अन्नधान्य पुरवठा विभाग, समाज विकास विभाग, जन्म- मृत्यू नोंदणी, आधार केंद्र, तर पहिल्या मजल्यावर पोलीस उपायुक्त कार्यालय, निवडणूक कार्यालय आहे.
दुसन्या मजल्यावर घनकचरा, आरोग्य, इंजिनिअरिंग विभाग, उपअभियंते, सहायकआयुक्त कार्यालय, तर तिसन्या मजल्यावर अतिक्रमण व विद्युत विभागासह सभागृह आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे नागरिक व अधिकाऱ्यांनाही त्रास होतो.
प्रत्येक महिन्यात सरासरी १५ दिवस लिफ्ट बंद असते. ही बाब नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक आहे. यासंदर्भात काही स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेला इशारा दिला आहे की, लवकरात लवकर नवीन लिफ्ट बसवण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात जाईल.
यासंदर्भात येथील रहिवासी मनोज शेट्टी म्हणाले की लिफ्ट नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक यांना फार त्रास होतो. ही लिफ्ट दुरुस्तीच्या वेळी बंद पडली त्यामुळे लगेच मदत मिळाली. एरवी ही लिफ्ट जर अशी कधीही बंद पडली तर अचानक अशी मदत मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे काही अनर्थ घडण्याआधी नवी लिफ्ट बसवावी.
यासंदर्भात येरवडा क्षेत्रिय कार्यलयाचे सहायक आयुक्त अशोक भवारी म्हणाले की, या कार्यालयातील लिफ्ट जवळपास २० वर्षापूर्वीची असून ती तांत्रिकदृष्ट्या निष्क्रिय घोषित केली गेली आहे. मात्र, तरीही ती कशीबशी चालवली जात आहे. या पंधरा दिवसात तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली होती.
महापालिकेने नवीन लिफ्टसाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. मात्र, निविदेतील अटी कठीण असल्यामुळे एकही ठेकेदार पात्र ठरला नाही. दुसऱ्यांदा जाहिरात दिल्यानंतरही नवीन लिफ्ट निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही.