Pune : खराडीत आलिशान फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी, ३ महिला अन् २ पुरुषांना घेतलं ताब्यात
esakal July 27, 2025 04:45 PM

पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरात हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं धाड टाकत कारवाई केली. एका आलिशान फ्लॅटमध्ये शनिवारी मध्यरात्री ही पार्टी सुरू होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त करण्यात आलाय. तर ३ महिला आणि २ पुरुषांनाही ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खराडी परिसरात एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या रेव्ह पार्टीत महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळून आले. तसेच, फ्लॅटमध्ये दारू आणि हुक्क्याचा वापरही होत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून अमली पदार्थ, हुक्का आणि दारूसह अनेक पुरावे जप्त केले.

Pune : घरी निघालेली तरुणी, ३ नराधमांनी अडवून कारमध्ये बसवलं; हातपाय बांधून गाडीतच अत्याचार, लोणावळा हादरलं

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. यापूर्वीही शहरात अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. रेव्ह पार्टी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रेव्ह पार्टीचे आयोजन कुणी केलं, अमली पदार्थ कुणी पुरवले, कुठून आणले याचा शोध पोलीस घेत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.