Nashik Crime : 'जीएसटी' बनावट सॉफ्टवेअर प्रकरण; देवळालीतील इंजिनिअर ताब्यात, गुप्तचरांची झडती सुरू
esakal July 27, 2025 09:45 PM

नाशिक रोड: ‘जीएसटी’चे बनावट सॉफ्टवेअर बनवून त्याद्वारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील ‘जीएसटी’ गुप्तचर विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. २६) पहाटे देवळालीगावातील संशयित सॉफ्टवेअर इंजिनियर युवकाच्या घरावर छापा टाकला. पथकाने त्याच्या घरातून परवाना नसलेले पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ‘जीएसटी’ फसवणूक प्रकरणात पथकाकडून रात्री उशिरापर्यंत झडतीसत्र सुरू होते. ‘जीएसटी’साठी बनावट सॉफ्टवेअर आणि करपावत्या बनवून लाखोंचा कर चुकविल्याचा पथकाचा संशय आहे.

श्रीकांत प्रसाद पऱ्हे (रा. कपालेश्वर सोसायटी, देवळालीगाव) असे संशयित सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे. ‘जीएसटी’चे अधीक्षक मनोज ईश्वर चौधरी यांच्या फिर्यादीनुसार, संशयित श्रीकांत पऱ्हे याच्या कपालेश्वर सोसायटीतील सदनिकेवर शनिवारी पहाटे पुणे येथील ‘जीएसटी’च्या गुप्तचर विभागाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात ‘जीएसटी’च्या पथकाने महत्त्वाची कागदपत्रे, हार्डडिस्क जप्त केली आहे. पथकाने त्याच्या फ्लॅटसह कार्यालयावर एकाच वेळी छापा टाकून शोधमोहीम राबविली.

परिसरात पोलिसांची वाहने पाहून नागरिकांनी मोठी गर्दी केली. ‘जीएसटी’च्या पथकाने संगणक, सर्व्हर, हार्डडिस्क, पेनड्राइव्ह आणि आर्थिक व्यवहारांची संशयास्पद कागदपत्रे जप्त केल्याचे समजते. या कारवाईत पथकाकडून घरझडती घेतली जात असताना घरातून परवाना नसलेले पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हाती लागली आहेत. संशयिताकडे याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर नसल्याने उपनगर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. त्यानुसार, उपनगर पोलिसांत अवैधरीत्या हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करचुकवेगिरीचा फंडा

संशयित पऱ्हे हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. नाशिकमधून मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी आणि बनावट बिले पुणे ‘जीएसटी’ विभागाला प्राप्त झाली होती. याबाबत ‘जीएसटी’च्या गुप्तचर विभागाने चौकशी केल्यावर शनिवारी पहाटेच पथकाने छापा टाकला. संशयित पऱ्हे याने बनावट बिले तयार करून दिल्याने त्याद्वारे करचुकवेगिरी करीत कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे संशय व्यक्त होतो आहे.

रात्री उशिरापर्यंत पथकांकडून झडतीसत्र सुरूच होते. तसेच, कागदपत्रांची छाननी केली जात होती. संशयित पऱ्हे यास ‘जीएसटी’च्या गुप्तचर पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. संशयित पऱ्हे याने केलेल्या फसवणुकीसंदर्भात मात्र ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

Pune : खराडीत आलिशान फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी, ३ महिला अन् २ पुरुषांना घेतलं ताब्यात

‘जीएसटी’ पुणे विभागाच्या गुप्तचर पथकाने देवळालीगावातील सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरावर छापा टाकला. संशयित ‘जीएसटी’ गुप्तचर पथकाच्या ताब्यात आहे.

- किशोर काळे,पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.