बारामती, ता. २६ : गुजरातमधील महाविद्यालयांकडून आता बारामतीच्या महाविद्यालयांचा अभ्यास केला जाणार आहे. शैक्षणिक हब म्हणून उदयास आलेल्या बारामतीच्या दृष्टीने हा एक अभिमानास्पद क्षण आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास नॅककडून अ + दर्जा प्राप्त झाला आहे. यानंतर गुजरात सरकारने गुजरात शासकीय विज्ञान महाविद्यालय (पारडी, जि. बलसाड) या महाविद्यालयास बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे महाविद्यालय पाहून तेथील कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी एक लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या महाविद्यालयाचे शिष्टमंडळ तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार असून, विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात शैक्षणिक, प्रशासकीय, सहशैक्षणिक व गुणवत्ता वृद्धी उपक्रमांचा अभ्यास करणार आहे. या अभ्यासदौऱ्यात प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकसित केलेली शैक्षणिक धोरणे, प्रशासनातील पारदर्शकता, विद्यार्थी विकास केंद्राचे उपक्रम, तसेच नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी याची माहिती ते घेणार आहेत.